लाइफलाइनचा रक्तपुरवठा थांबला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

अन्न व औषध प्रशासनाने ठेवले त्रुटींवर बोट - सूचना देऊनही अंमलबजावणी नाही

नागपूर - उपराजधानीतील लाइफलाइन रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत त्या दूर होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. वारंवार त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्यानंतरही लाइफलाइनतर्फे अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे अखेर एफडीएने शनिवारपासून रक्‍तपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले. 

जानेवारी २०१७ मध्ये शहरातील अनेक रक्तपेढ्यांची तपासणी करण्यात आली. पायाभूत सुविधांमध्ये त्रुटी आढळून आल्या. नियमानुसार रक्तपेढीतील रक्तपुरवठ्यासंदर्भातील नोंदी आढळून आल्या नाहीत. रक्त हाताळण्याच्या पद्धतीतही दोष आढळून आला. तर, रक्त ठेवण्यात येणारा टेबल व परिसर अस्वच्छ दिसून आल्याची नोंद एफडीएने घेतली. या त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारला गेला. लाइफलाइन रक्तपेढीशिवाय पाच मेट्रो व इतर रक्तपेढ्यांची तपासणी एफडीएतर्फे करण्यात आली होती.

रक्तपेढ्यांची तपासणी ही ‘रुटीन ॲक्‍टिव्हिटी’ असल्याचे एफडीएचे म्हणणे आहे. रक्तपेढीत ‘एफडीए’ने त्रुटी काढल्या असल्याने त्या दूर करण्यासाठी लाइफलाइन रक्तपेढीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले. तडकाफडकी प्रशासन कामाला लागले आहे. इतरही रक्तपेढींनी दोन दिवसांत त्रुटी दूर करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

आरोग्यवर्धक रक्त गोळा करून ते रुग्णाला दिले जावे, हा नियम सांगतो. यामुळेच अयोग्य  पद्धतीने होत असलेल्या कामावर अंकुश ठेवण्याचे काम एफडीए करीत आहे. लाइफलाइनच्‍या कामात काही  त्रुटी आढळल्‍या. त्‍या दूर झाल्यानंतर पाहणी करण्यात येईल. रक्तपुरवठा करण्याची प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सर्वसामान्‍यांची गैरसोय होत असली तरी, पाहणीनंतर त्रुटी दूर झाल्यास तत्काळ रक्तपुरवठ्यास परवानगी देण्यात येईल.

- एम. जी. केकतपुरे, सहआयुक्त अन्न व प्रशासन विभाग (औषध).

Web Title: blood supply stop to lifeline