रक्ताच्या दलालीत डॉक्‍टरांचे हात काळे

रक्ताच्या दलालीत डॉक्‍टरांचे हात काळे

नागपूर : रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते. स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांच्या भरवशावर रक्तदानाची चळवळ उभी झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी येणाऱ्या गरिबांवर उपचार मिळावे यासाठी रक्तदान शिबिरात भरपूर प्रतिसाद मिळतो. परंतु येथील डॉक्‍टर रुग्णांच्या नातेवाइकांना मेडिकलमधील रक्तपेढीतून रक्त आणायला न सांगता, थेट खासगी रक्तपेढीच्या दलालांचा मोबाईल क्रमांक देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. विशेष असे की, वॉर्ड क्रमांक 17 मधील हा प्रकार पुढे आला असून लाल रक्ताच्या दलालीत मेडिकलमधील डॉक्‍टरांचे हात काळे झाले असल्याचे यावरून स्पष्ट होते. 
मेडिकलच्या वॉर्डात खासगी रुग्णालयांच्या एजंटचा सुळसुळाट आहे, हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. तर नुकतेच खासगी पॅथॉलॉजीतील तंत्रज्ञ थेट वॉर्डात शिरून खाटेवरील रुग्णांचे रक्त काढून खासगीत तपासणीसाठी घेऊन जातात. रंगेहात पकडण्यातही आले. मात्र आता खासगी रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिरातून गोळा केलेले रक्त विकणारी टोळी मेडिकलमध्ये सक्रिय केली आहे. मेडिकलमध्ये खासगी रुग्णवाहिकांचा सुळसुळाट आहे. रात्री अपरात्री येथे रुग्णवाहिकांची गर्दी दिसते. रुग्णवाहिकेपासून तर ऑटोचालकांपर्यंत सारेच येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जिवाची भीती दाखवून खासगी रुग्णालयात स्वस्त उपचाराची हमी देत फूस लावून पळवून लावतात. 
एका पिशवीची किंमत 1600 रुपये 
वॉर्ड क्रमांक 17 मध्ये भरती असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाइकाला निखिल नावाच्या तरुणाचा नंबर देण्यात आला. याच्याकडून "रक्त' विकत आणण्याची सूचना येथील डॉक्‍टरने केली. विशेष असे की, रुग्णाच्या रक्ताचा गटही रुग्णाच्या नातेवाइकाला सांगण्यात आला नाही. मात्र याप्रसंगी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते उपस्थित असल्याने हा प्रकार उघडकीस आला. कार्यकर्त्याने निखिलशी संवाद साधल्यानंतर 1600 रुपये पडतील असे सांगितले. मेडिकलमध्ये दरवर्षी 14 हजार रक्तपिशव्या गोळा होतात. चाचणी फी अदा केल्यानंतर मोफत रक्त मिळते, परंतु डॉक्‍टरांचे लागेबांधे असल्याने गरीब रुग्णांना भुर्दंड पडत असल्याचा प्रकार पुढे आला. 
दलालांना अभय 
रक्ताची दलाली करणाऱ्या व्यक्तीला मेडिकलमध्ये महिनाभरापूर्वी पकडण्यात आले होते. अजनी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी सोडून दिले जाते. अशाप्रकारे या दलालास अभय मिळत असल्यानेच असा दलालांचा सुळसुळाट मेडिकलमध्ये आढळून येतो, असे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com