
पालकमंत्री राठोड म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही रक्तसंकलन वाहिनी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करताना मनापासून आनंद होत आहे. जिल्ह्यात सिकलसेलग्रस्त व थालेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत.
यवतमाळ : जिल्ह्यात दरवर्षी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करण्यात येते. रक्तदान करणाऱ्यांची जिल्ह्यात कमतरता नाही. मात्र, ग्रामीण भागातील अनेक रक्तदाते शहरात येऊन रक्तदान करू शकत नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वनविभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रक्तसंकलन वाहिनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्तसाठा वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंकलन वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून पालकमंत्री राठोड बोलत होते. यावेळी जि. प.च्या अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख एम. रामबाबू, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, ऋषिकेश रंजन, व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा - डॉ. होमी जहॉंगीर भाभा पुण्यतिथी विशेष: भारताचे ‘लिओनार्दो दा विंची‘ बैठकीसाठी आले...
पालकमंत्री राठोड म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही रक्तसंकलन वाहिनी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करताना मनापासून आनंद होत आहे. जिल्ह्यात सिकलसेलग्रस्त व थालेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना दरमहा रक्त द्यावे लागते. शिवाय अपघातग्रस्तांनाही रक्ताची आवश्यकता असते. अशावेळी जिल्ह्यात रक्ताचा मुबलक साठा असला पाहिजे.
आतापर्यंत सामाजिक संघटना व आरोग्य यंत्रणेच्या वतीने शिबिराच्या माध्यमातून रक्तसंकलन केले जात होते. भविष्यातही रक्तदान शिबिरे आयोजित असली तरी रक्तसंकलन वाहिनीद्वारे मात्र, ग्रामीण भागात थेट जाऊन इच्छुकांकडून रक्तसंकलन करणे अतिशय सोपे झाले आहे. विशेष म्हणजे शिबिरासाठी येणारा खर्च व वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होईल. या वाहनात जनरेटर व्यवस्था लावण्यात आल्याने रक्त संकलनात अडथळा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण भारती यांनी केले. उपवनसंरक्षक केशव वाबळे, के. व्ही. भांबुरकर, विभागीय व्यवस्थापक श्री. कोरे, राजेंद्र गायवकवाड आदी उपस्थित होते.
नक्की वाचा - असाही एक अवलीया... जमीन दान करून केले गरिबांचे स्वप्न पूर्ण; थाटला दहा बेघरांचा संसार
विविध संस्थांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान
जिल्ह्यात रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यात महाआरोग्य सेवा समिती, शिवशक्ती ऑटोडील, निःस्वार्थ प्रेरणा प्रतिष्ठान, सक्षम फाऊंडेशन यांच्यासह 25 संघटनांचा समावेश होता.
संपादन - अथर्व महांकाळ