सर्वत्र शोध घेऊन हताश झालेले कुटुंबीय बसले होते घरी अन्‌ खणखणला फोन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

हनुमंत साखरकर हे 14 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. यासंदर्भात 15 तारखेला मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यांनतर पोलिसांनी हनुमंत यांचा तपास सुरू केला. वीटा येथील पोलिस पाटील बबन डाहे यांना अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या विटाळा गावानजीकच्या शेतशिवारा जवळ असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पोत्यात काहीतरी तरंगताना आढळले. 

धामणगाव रेल्वे (अमरावती) : सहा दिवसांपूर्वी गावातील एक व्यक्‍ती बेपत्ता झाला. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही कोणता थांगपत्ता लागला नाही. मित्र व नातेवाईकांकडे विचारपूस करूनही काही उपयोग झाला नाही. अपयशच पदरी पडत असल्यामुळे नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता तलावात काहीतरी तरंगताना आढळले. बाहेर काढून बघितले असता पोत्यात एक मृतदेह होता. तो मृतदेह सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले हनुमंत प्रकाश साखरकर (वय 40) यांचा होता. 

अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तालुक्‍यातील विटाळा गावानजीकच्या वर्धा नदी पात्रात सहा दिवसांपूर्वी हरवलेल्या व्यक्तीचा पोत्यात बांधून ठेवलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाच्या गळ्याला विजेच्या तारेने गळफास दिल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवार (ता.20) ला सायंकाळी उघडकीस आली.

जाणून घ्या - अन त्यांचा अखेरचा प्रवासही सोबतच झाला...आणि गहिवरली गर्दी

मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत साखरकर हे 14 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. यासंदर्भात 15 तारखेला मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यांनतर पोलिसांनी हनुमंत यांचा तपास सुरू केला. वीटा येथील पोलिस पाटील बबन डाहे यांना अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या विटाळा गावानजीकच्या शेतशिवारा जवळ असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पोत्यात काहीतरी तरंगताना आढळले. 

त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पोते बाहेर काढले. पोते उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळला. मृतदेहाचा गळ्यावर वीज ताराचे निशान दिसले. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नाही. परंतु, सहा दिवसांपूर्वी मंगरूळ दस्तगीर येथील एका व्यक्तीची हरविल्याची तक्रार ठाण्यात देण्यात आली होती. त्यावरून त्यांच्या कुटुंबियांना घटनास्थळी पाचारण केले. तेव्हा हा मृतदेह हनुमंताचा असल्याची ओळख पटली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वास वानखडे, पोलिस कर्मचारी पवन हजारे, अतुल पाटील व योगेंद्र लाड करीत आहेत. 

चार दिवसांपूर्वी खून

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. मृतदेहावरून व्यक्तीची चार दिवसांपूर्वी खून केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत हनुमंत साखरकर हे मंगरूळ दस्तगीर येथे ऑटो चालवत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे. दरम्यान मृताचे मोठे भाऊ श्रीमंत प्रकाश साखरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: body found in Lake at Amravati