कपाशीचे पाच टक्‍के बियाणे बोगस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

नागपूर - पेरणीच्या हंगाम येत्या १५ दिवसांत पूर्ण होणार असून ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पेरणी होईल, असा अंदाज आहे. यावर्षी प्रसिद्ध कंपन्यांच्या वेष्टणामध्ये बोगस बियाणे बाजारात आल्याची चर्चा आहे. याची सरासरी टक्‍केवारी ५ टक्‍के असल्याने शेतकऱ्यांच्या मनात धस्स झाले आहे. विदर्भात २ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले आहे, हे विशेष.

नागपूर - पेरणीच्या हंगाम येत्या १५ दिवसांत पूर्ण होणार असून ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पेरणी होईल, असा अंदाज आहे. यावर्षी प्रसिद्ध कंपन्यांच्या वेष्टणामध्ये बोगस बियाणे बाजारात आल्याची चर्चा आहे. याची सरासरी टक्‍केवारी ५ टक्‍के असल्याने शेतकऱ्यांच्या मनात धस्स झाले आहे. विदर्भात २ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले आहे, हे विशेष.

विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पश्‍चिम विदर्भात हे प्रमुख पीक आहे. तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्‍यात कापसाची लागवड करण्यात येते. सध्या अमरावती विभागात बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषिविक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू आहे. विभागातील अकोला व यवतमाळात सोयाबीन व कापसाचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले. 

या दोन्ही जिल्ह्यांत २६ लाख ६८ हजार रुपये किमतीचे बोगस बियाणे जप्त केले आहे. आतापर्यंत १७० प्रकरणांत बियाण्यांचा गैरप्रकार समोर आला; तर ७५ केंद्रांना बियाण्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली. 

यवतमाळात बीटी वाणाचे ७ क्विंटल १८ किलो बनावट बियाणे आढळले, त्याची किंमत १२ लाख २८ हजार रुपये इतकी आहे. तर अकोल्यातील जानकी सीड्‌स या केंद्रात २४० क्विंटल ७ किलो सोयाबीनचे बनावट बियाणे सापडले, त्याची किंमत १९ लाख ५० हजार रुपये आहे. या दोन्ही ठिकाणांहून बनावट बियाणे जप्त करण्यात आले. ७५ कृषिकेंद्रांना बियाण्यांच्या विक्रीला मनाई करण्यात आली. यात बुलडाणा ३५, वाशीम २२, यवतमाळ १४, अकोला १५ आणि अमरावतीमधील ७ केंद्रांचा समावेश आहे. हंगामाच्या सुरवातीलाच कापसाच्या बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या चार विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६५० पाकिटे बियाणे जप्त केली आहेत. हिंगणघाट-दोन, समुद्रपूर-एक तर देवळी तालुक्‍यात एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळ जिल्हृयात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात बोगस ‘बीटी’ची पेरणी झाली होती. त्याचा परिणाम बोंडअळीच्या रूपाने दिसला. यंदा चोरमार्गाने येणाऱ्या ‘बी. टी.’वर कृषी विभागाने फार्स आवळून ठेवला. पाच टक्के हेक्‍टरवर यंदाही बोगस बियाण्याची लागवड झाल्याचा अंदाज आहे. कारवाईतून तब्बल १ हजार ४८४ बोगस बियाण्याचे पाकिटे जप्त करण्यात आले.

...तर शेतकऱ्यांवर कारवाई
बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात कृषी विभागाने दंड थोपटले आहे. त्यानंतर आता बोगस बियाणे पेरणी करण्याविरोधातही कृषी विभाग सक्रिय होत आहे. एखाद्याने बोगस बियाणे पेरणी केल्याचे माहीत झाल्यास संबंधित ठिकाणी जाऊन पिकांचे नमुने घेतले जाणार आहे. ते तथ्य आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांवरच पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Web Title: bogus cotton seed