समांतर वाहतूक कार्यालय उघडकीस

Bogus-Transport-Office
Bogus-Transport-Office

नागपूर - वाहतूक पोलिस उपायुक्‍ताचे बनावट शिक्‍के आणि कार्यालयीन कागदपत्रे तयार करून पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. ट्रकचालकास वाहतूक शाखेच्या उपायुक्‍तांची हुबेहूब स्वाक्षरी आणि कार्यालयीन दस्तावेज बनवून शहरात प्रवेश असल्याची पास बनविली होती.

कळमना पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. संतोष जयराम जिपके (वय ४३, नागार्जुन कॉलनी, नारी रोड) आणि दीपक श्रीकांत गणवीर (वय ३२, उप्पलवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. अवैध वाहतूक करता यावी, यासाठी वाहनचालकांनी समांतर बोगस वाहतूक उपायुक्‍त कार्यालय थाटल्याची चर्चा आहे.

शहरात अनेक ट्रकचालक तसेच वाहनचालक बोगस कागदपत्रे आणि पास तयार करून शहरात अवैध प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक करीत आहेत. हा प्रकार सोमवारी सकाळी पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. ट्रकचालक संतोष जिपके आणि दीपक गणवीर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता गौण खणिजाने भरलेला ट्रक शहरात नेत होते. दरम्यान, पीआय फुलपगारे यांना ट्रकचालकावर संशय आला. त्यांनी कापसी पुलाजवळ बाराजरी कटिंगजवळ ट्रक अडविला. त्यांची चौकशी केली असता त्यांनी शहरातील प्रवेश पास दाखविला. त्यात २० मार्च ते १८ एप्रिलपर्यंत शहरात प्रवेश असल्याचे नमूद होते. त्यावर पोलिस उपायुक्‍त एस. चैतन्य यांच्याऐवजी पोलिस उपायुक्‍त रवींद्रसिंह परदेशी यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे फुलपगारे यांनी उपायुक्‍त कार्यालयात प्रवेश पासचे फोटो व्हॉट्‌सॲपवर पाठवून खात्री केली. तो पास बोगस असल्याचे लक्षात येताच संतोष आणि दीपक या दोघांनाही कळमना पोलिस ठाण्यात ट्रकसह नेले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

‘अर्थपूर्ण’ मूकसंमती
सीताबर्डीत अवैध वाहतूक आणि ऑटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सर्वांना वाहतूक पोलिस निरीक्षकांची ‘अर्थपूर्ण’ आणि मूकसंमती आहे. अनेक खासगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक व्हेरायटी चौक-सीताबर्डीतून केली जाते. ‘साहब से बात हो गयी’ असा पासवर्ड वापरत असल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना ऑटोचालकांवर कारवाई करता येत नसल्याची माहिती आहे.

जुन्या शिक्‍क्‍याने केला घोळ
ट्रकचालक भरधाव वाहन चालवीत शहरात येत होता. त्याने दाखविलेली कागदपत्रे बोगस होती. त्यावर पोलिस उपायुक्‍तांचा शिक्‍का होता. त्यावर वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्‍त रवींद्रसिंह परदेशी यांची हुबेहूब स्वाक्षरी होती. २० मार्च ते १८ एप्रिल असा कालावधी नमूद होता. मात्र, डीसीपी परदेशी यांनी २ फेब्रुवारीलाच वाहतूक उपायुक्‍तपदाचा चार्ज सोडला. त्यामुळे आरोपींना उपायुक्‍तांची बदली झाल्याची माहिती नसल्यामुळे घोळ झाला.

मोठी टोळी असण्याची शक्‍यता
गुन्हेशाखेने यापूर्वी अंबाझरीत सुरू असलेल्या समांतर जिल्हाधिकारी कार्यालयावर छापा घालून ३४ सेवा पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांचे बनावट शिक्‍के, प्रमाणपत्र आणि दस्तावेज जप्त केले होते. तसेच शहरात अवैध वाहतूक करण्यासाठी टोळीने शक्‍कल लढवून ट्रॅफिक डीसीपी कार्यालयाचे बनावट शिक्‍के आणि हुबेहूब सही करण्याची किमया केली. त्यामुळे तपासांत मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com