दुसऱ्या पत्नीनं केली अत्याचाराची तक्रार; पहिल्या पत्नीनंही केला गुन्हा दाखल; पोलिसाची नाचक्की  

संतोष ताकपिरे 
Tuesday, 20 October 2020

पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी पोलिस कर्मचारी मुकेश यादवसह कुटुंबातील आठ जणांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार, विश्‍वासघातप्रकरणी गुन्हे दाखल केले.

अमरावती :  काही दिवसांपूर्वी आयुष्यात आलेल्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसाविरुद्ध अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पहिल्या पत्नीनेसुद्धा पोलिस पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदविली.

पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी पोलिस कर्मचारी मुकेश यादवसह कुटुंबातील आठ जणांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार, विश्‍वासघातप्रकरणी गुन्हे दाखल केले. विवाहित मुकेशला पहिल्या पत्नीपासून दोन मुली असतानाच त्याच्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी दुसरीने प्रवेश केला. ती पोलिस विभागात आहे. 

अधिक माहितीसाठी - Video : हृदयाला फुटले पाझर; जेव्हा विधवा म्हणाली, ‘घरचा कर्ता पुरुष गेल्यावर जगायच कसं’

पहिल्या पत्नीच्या आक्षेपानंतर पोलिस शिपाई मुकेश व त्याची मैत्रीण या दोघांना वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे हजरही करण्यात आले होते. प्रकरण तेव्हा मिटण्याच्या तयारीत होते. परंतु त्यानंतर काही दिवसांतच मुकेशच्या आयुष्यात आलेल्या दुसरी पत्नीने तिच्याकडील दहा लाखांचे दागिने भुलथापा देऊन मुकेशने हडपले. शिवाय बळजबरीने अत्याचारही केला, असा आरोप गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीत केला होता. 

त्यावरून पोलिस शिपाई मुकेशविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. हे विशेष. त्यानंतर सामोपचाराने तिढा सुटत नसल्याचे बघून आता दोन मुलींची आई असलेल्या मुकेशच्या पहिल्या पत्नीने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली. त्यात लग्नात हुंडा कमी मिळाला म्हणून मुकेशचे दुसरे लग्न महिला पोलिसाशी लावून दिले. 

आपला मुलींसह स्वीकार करण्यास पती व सासरच्यांनी नकार दिला. शारीरिक व मानसिक छळ केला. पतीच्या आयुष्यात आलेल्या दुसरीनेही पहिले लग्न झाले असताना मुकेशसोबत दुसरे लग्न केल्याने आपल्या कौटुंबिक छळाला तीसुद्धा जबाबदार असल्याचा आरोप पोलिस शिपायाच्या पहिल्या पत्नीने केल्याने हा गुन्हा दाखल झाला.

सविस्तर वाचा - चाळीसचे फेडले ८५ लाख; तरी सावकार करायचा १३ लाखांची मागणी; त्रास असह्य झाल्याने घेतला गळफास

कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार असल्याने त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी महिला समूपदेशन केंद्राकडून प्रयत्न झाले. अखेर मार्ग न निघाल्याने पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला.
-पुंडलिक मेश्राम,
 पोलिस निरीक्षक फ्रेजरपुरा ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both wives of police made complaint against him