कोट्यवधींच्या उलाढालीला ब्रेक: टाळेबंदीत कम्प्युटर, लॅपटॉप खरेदी "लॉक' 

श्रीकांत पेशट्टीवार 
रविवार, 31 मे 2020

मात्र, सध्या मुंबई, पुणे, दिल्ली येथून वाहतूक बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात या वस्तू उपलब्ध नाही. काही विक्रेत्यांनी नागपुरातून या साहित्याची उचल केली आहे. मात्र, त्याचे दर जास्त असल्याने आता तेथून हे साहित्य आणणे विक्रेत्यांनी बंद केले आहे.

चंद्रपूर : देशात सुरू असलेल्या टाळेबंदीत अनेक व्यवसायांना कुलुप लागले. यातून लॅपटॉप, संगणक खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुटला नाही. पुणे, मुंबई, दिल्लीतून लॅपटॉप, संगणक ट्रान्स्पोर्ट केली जातात. टाळेबंदीत ट्रान्स्पोर्टिंग ठप्प पडली आहे. त्यामुळे ही उत्पादने बाजारात उपलब्ध नाही. परिणामी, याचा मोठा फटका या व्यावसायिकांना बसत आहे. विशेष म्हणजे, उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांत लॅपटॉप, संगणक खरेदीसाठी मोठी गर्दी व्हायची. मात्र, यंदा कोरोनाने ही गर्दी मंदावली आहे. टाळेबंदीत कोट्यवधींच्या उलढालीला ब्रेक लागला आहे. 

हे वाचा— गंभीर! पाठ्यपुस्तकांसाठी लागू शकते पालकांच्या खिशाला कात्री, हे आहे कारण

जिल्ह्यात 66 दुकाने 
चंद्रपूर डिस्ट्रीक्‍ट कॉम्प्युटर डिलर असोसिएशनची निगडित जिल्ह्यात 66 दुकाने आहे. याशिवाय छोटे-मोठी दुकाने मिळून 120 ते 150 आहे. या दुकानांतून लॅपटॉप, संगणक विक्री केल्या जातात. साधारपणे या दुकानातून 40 ते 50 लॅपटॉप, संगणक महिन्याभरात विकले जातात. यातून कोट्यवधींचा उलाढाल चालते. यंदा मार्च महिन्यात देशात कोरोनाने हातपाय पसरले. त्यामुळे देश लॉकडाउन झाले. लॉकडाउनमुळे अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडले. त्यात कॉम्प्यूटर, संगणक विक्रेत्यांचाही समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुंबई, पुणे, दिल्ली आणि नागपुरात कॉम्प्यूटर, लॅपटॉपाशिवाय दुरुस्तीचे सुटे भागही येतात. मार्च महिन्यात लॉकडाउन झाले. लॉकडाउन काळात औषध, दूधाची वाहतूक सुरू आहे. अन्य वस्तू ने-आणवर निर्बंध घालण्यात आले. त्याचा फटका संगणक, लॅपटॉप विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. 

हे वाचा— राज्यातील कोविड प्रयोगशाळांची संख्या तोकडीच... चाचण्या वाढविण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय

ऍडंड्राईड मोबाइल, संगणक, लॅपटॉपची मागणी 
सध्या शाळा, कॉन्व्हेंटमध्ये ऑनलाइन शिकविले जात आहे. त्यामुळे ऍडंड्राईड मोबाइल, संगणक, लॅपटॉप याची मागणी वाढली आहे. एचपी, डेल, लिनोवा या कंपनीच्या लॅपटॉपसह संगणकांनाही पालक, विद्यार्थ्यांची पसंती देतात. लॅपटॉप 25 हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत, तर संगणक चाळीस ते पंचेचाळीस हजारांपासून सुरू होतात. मात्र, सध्या मुंबई, पुणे, दिल्ली येथून वाहतूक बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात या वस्तू उपलब्ध नाही. काही विक्रेत्यांनी नागपुरातून या साहित्याची उचल केली आहे. मात्र, त्याचे दर जास्त असल्याने आता तेथून हे साहित्य आणणे विक्रेत्यांनी बंद केले आहे. लॅपटॉप, संगणक विक्रीसोबत दुरुस्त्यांचीही कामेही बंद पडली आहे. संगणक, लॅपटॉप दुरुस्ती करणाऱ्यांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे तेही सध्या घरीच बसून आहेत. 

पुणे, मुंबई, दिल्लीतून संगणक, लॅपटॉप, संगणक येतात. लॉकडाउनमुळे वाहतूक बंद असल्याने हे साहित्य जिल्ह्यात येणे बंद पडले आहे. त्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसत आहे. तीन ते चार कोटींचा उलढाल ठप्प पडली आहे. दुरुस्त्यांची कामे बंद पडली आहेत. 
- प्रशांत आवळे, अध्यक्ष, चंद्रपूर डिस्ट्रिक्‍ट कॉम्प्यूटर डिलर असोसिएशन चंद्रपूर. 

दररोज पाच ते सात संगणक, लॅपटॉप पूर्वी विक्रीस जायचे. आता विक्री जवळपास बंद पडली आहे. लॉकडाउनमुळे आमच्या व्यवसायावर मंदीचे सावट पसरले आहे. 
- निखिल बुराण,संचालक, स्मार्ट लिंक सिस्टिम चंद्रपूर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Break on multi-billion dollar turnover: Locked computer, laptop purchase "locked"