सहायक लेखा अधिकाऱ्याने घेतली साडेचार हजारांची लाच

सहायक लेखा अधिकाऱ्याने घेतली साडेचार हजारांची लाच

नागपूर : कामांचे बिल मंजूर करण्यासाठी एका कंत्राटदाराकडून साडेचार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने नागपूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील लाचखोर सहायक लेखा अधिकारी सुदाम वामनराव पांगूळ (54) याला रंगेहात पकडले. यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू कैलासनगर येथे राहणारे तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार आहेत. तक्रारदाराने मौदा उपविभागातील 9 कामांच्या निविदा घेतल्या होत्या. नऊही निविदांचे काम त्यांनी वेळेत पूर्ण करून बिलाची फाइल लेखा विभागाकडे सादर केली होती. बिल मंजुरीसाठी या फायली सहायक लेखा अधिकारी सुदाम पांगूळ याच्याकडे आल्या होत्या. बिल मंजूर करण्यासाठी पांगूळ याने साडेचार हजारांची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली होती. 
या तक्रारीवरून पोलिस उपअधीक्षक संदीप जगताप यांनी पडताळणी केली. पडताळणीत पांगूळ याने लाच घेण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बुधवारी जिल्हा परिषदेभोवती सापळा रचण्यात आला होता. तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना पैशासह रंगेहात पकडले. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पांगूळ याला अटक करण्यात आली. 
पांगूळची वादग्रस्त कारकीर्द 
लाच म्हणून पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम करणार नाही, अशी भूमिका सुदाम पांगूळची होती. त्याच्या स्वभावाला अनेक सहकारी कंटाळले होते. पांगूळ याला एसीबीने अटक केल्यानंतर अनेकांनी "कर्माची फळे' असा उल्लेख करीत आनंद व्यक्‍त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com