लाचखोर लाइनमनला अटक; तीन हजारांची घेतली लाच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

एकतर वीज जोडणीचा अर्ज करूनही वितरण कंपनी जोडणी देत नाही. पिकांची स्थिती पाहून शेतक-याने वीज चोरी केली तर त्याच्यावरच कारवाइचा दंडूका उगारला जातो. त्यावर "सव्वा शेर' म्हणजे कारवाइतून वाचविण्यासाठी त्याच्याकडे लाच मागीतली जात असल्यामुळे या प्रकरणाबाबत तालुक्‍यात आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येते.

भिवापूर (जि.नागपूर): शेतात पिकांना पाणी देण्यासाठी वीजचोरी करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाइ न करण्यासाठी वीज लाइनमेनने शेतकऱ्याकडून तिन हजार रूपयांची लाच घेतली. शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने रचलेल्या सापळयात दोन लाईनमेन अलगद अडकले. एकतर वीज जोडणीचा अर्ज करूनही वितरण कंपनी जोडणी देत नाही. पिकांची स्थिती पाहून शेतक-याने वीज चोरी केली तर त्याच्यावरच कारवाइचा दंडूका उगारला जातो. त्यावर "सव्वा शेर' म्हणजे कारवाइतून वाचविण्यासाठी त्याच्याकडे लाच मागीतली जात असल्यामुळे या प्रकरणाबाबत तालुक्‍यात आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येते.

अधिक वाचा- अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

 

एसीबीचा सापळा
अनधिकृतरित्या वीजजोडणी केल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 3 हजाराची लाच घेणाऱ्या राज्य वीज वितरण कंपनीच्या दोन कंत्राटी लाइनमनला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. प्रीतम गौतम लोखंडे (25) आणि शुभम पुंडलिक हिंगे (25) अशी या लाचखोर लाइनमनची नावे आहेत. दोघेही 33 केव्ही उपकेंद्र भिवापूर येथे कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरखंडी धापर्ला येथील तक्रारदार शेती करतो. तक्रारकर्त्याच्या वडिलांच्या नावे धापर्ला येथे दोन एकर शेती आहे. शेतात विहीर असून पिकांना पाणी देण्यासाठी त्यांनी विद्युत मीटर लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी भिवापूर वीज उपकेंद्रात अर्ज करून 5748 रुपयांची डिमांड देखील भरली होती. डिमांड भरूनसुद्धा तक्रारदाराच्या शेतात मिटर लावण्यात आले नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याने विजेच्या तारांवर आकोडा टाकून विहिरीवर वीजप्रवाह घेतला होता. काही दिवसांपूर्वी प्रीतम आणि शुभम यांनी अवैधरित्या वीजपुरवठा घेतल्याप्रकरणी तक्रारकर्त्याला पकडले होते. त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी त्याला 4 हजाराची मागणी केली होती. दोघांनाही लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने भिवापूर येथे सापळा रचला. तक्रारकर्त्यांकडून तीन हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. याप्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक करण्यात आली.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribery Lineman arrested; Three thousand bribe take