20 कुटुंबांच्या जिवावर उठला कंत्राटदार

त्रिमूर्तीनगर ः अर्जुन अपार्टमेंटच्या संरक्षक भिंतीपर्यंत खचलेली माती.
त्रिमूर्तीनगर ः अर्जुन अपार्टमेंटच्या संरक्षक भिंतीपर्यंत खचलेली माती.

नागपूर, : पावसाळ्यात बहुमजली इमारतीला लागून असलेल्या नाल्यावर पुलाच्या कामास सुरुवात करून कंत्राटदार 20 कुटुंबांच्या जिवावर उठल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बांधकामासाठी खोदकाम करीत असताना रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे इमारतीलगतची माती खचण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे दोन इमारतींमधील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कंत्राटदाराने कामाच्या वेळेचे भान न राखल्याने नागरिकांना रात्री जागरण करावे लागले. त्रिमूर्तीनगरातील सरस्वती विहार कॉलनीतून महापालिकेचा नाला वाहत असून, यावरील पुलाचे स्लॅब जीर्ण झाले होते. त्यामुळे नव्या पुलासाठी कंत्राटदाराला तीन महिन्यांपूर्वीच कामाचे कार्यादेश दिल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, कंत्राटदाराने पावसाळ्यात खोदकाम सुरू करून नाल्याच्या बाजूला असलेले अर्जुन अपार्टमेंट तसेच अभिषेक अपार्टमेंटमधील 20 कुटुंबीयांचा जीव धोक्‍यात टाकला. याशिवाय नाल्याच्या दुसऱ्या बाजूला मालेश्‍वर अपार्टमेंटची संरक्षक भिंतीलाही धोका निर्माण झाला.अर्जुन अपार्टमेंटची सुरक्षा भिंत नाल्याला लागून आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे भिंतीपर्यंत तसेच अपार्टमेंटमधील एका दुकानाच्या पायरीपर्यंत माती खचली. नाल्याचा प्रवाह जोरात असल्याने अपार्टमेंटमधील कुटुंबीयांत भीती पसरली अन्‌ धावाधाव सुरू झाली. त्यातच अग्निशमन व आणीबाणी विभागाच्या जवानांनी रविवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अर्जुन अपार्टमेंटमधील नागरिकांना इमारत खाली करण्यास सांगितले. त्यामुळे आणखीच दहशत पसरली. एवढ्या रात्री मुले, वृद्धांना घेऊन कुठे जाणार? कसे होणार? इमारत पडणार तर नाही? या प्रश्‍नांनी इमारतीतील रहिवासी बेचैन झाले.सकाळी नागरिकांनी नगरसेवक व मनपाच्या अधिकाऱ्यांना कळविली. नगरसेवक प्रमोद तभाने, दिलीप दिवे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या ओएसडी आशा पठाण येथे आल्या. नाल्याजवळील इमारतीखालील माती खचत असल्याचे चित्र बघितल्यानंतर दिवे यांनी कंत्राटदाराची खरडपट्टी काढली. कंत्राटदाराला माती खचत असलेल्या ठिकाणी वाळूचे भरलेले पोते ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सोमवारी दिवसभर वाळूच्या पोत्यांनी सारवासारव सुरू होती. यानिमित्त महापालिका प्रशासनाचीही दिरंगाई चव्हाट्यावर आली.
आयुक्तांचे काम बंद करण्याचे निर्देश
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास परिसराची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता मनोज तालेवर, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर व इतर अधिकारीही उपस्थित होते. आयुक्तांनी काम बंद करण्याचे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वाळू, सिमेंट आदी भरलेली पोती ठेवण्याचे निर्देश दिले. काम पावसापूर्वी होत नसेल तर सुरूच कसे केले? असा शब्दात अधिकारी व कंत्राटदारांना सुनावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com