ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे क्रांतीकारी पाऊल - केंद्रीयमंत्री गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

केबलवर चालणाऱ्या बस संबंधात 15 ऑगस्टनंतर निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती देताना यामुळे प्रदूषणात घट होईल, असे स्पष्ट केले. 

नागपूर - रेल्वेच्या विस्तारात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे क्रांतीकारी पाऊल असून नागपुरातील या प्रकल्पामुळे भारताच्या इतिहासात नवा अध्याय जोडला जात असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नमुद केले. यावेळी त्यांनी हवेतून बस, अर्थात केबलवर चालणाऱ्या बस संबंधात 15 ऑगस्टनंतर निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती देताना यामुळे प्रदूषणात घट होईल, असे स्पष्ट केले. 

रेशिमबागेतील सुरेश भट सभागृहात महामेट्रोचे सुनील माथूर, रेल्वेचे डीआरएम सुमेशकुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पासंबंधाने करारावर स्वाक्षरी केली. या समारंभात केंद्रीयमंत्री गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ब्रॉडगेज मेट्रोने वर्धा-नागपूर अंतर 35 मिनिटांत तर रामटेक-नागपूर अंतर 20 मिनिटांत पूर्ण करता येईल. वर्धा-नागपूर प्रवासाचा बस तिकिटचा दर 90 रुपये असून ब्रॉडगेज मेट्रोमुळे नागरिकांना 60 रुपयांत एसीचा प्रवास शक्‍य होणार असून मोठा दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले. नागपूरप्रमाणेच भोपाल, इंदोर येथेही ब्रॉडगेज मेट्रो सुरू करावी, अशी सूचना त्यांनी उपस्थित असलेले रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना केली. केबलने विजेवरील बसप्रमाणे ट्रकही चालविता येईल, त्यामुळे प्रदूषणात घट होईल. सांडपाण्यातून मिथेन तयार होते, यातून वाहने चालविणे शक्‍य आहे. परंतु सरकारी यंत्रणेची समजूत काढणे, त्यातही महापालिकेच्या अधिकाऱ्यांची समजूत काढणे दिव्य काम असल्याचे नमुद करीत त्यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. वेकोलीतून कोळशासोबत रेतीही बाहेर निघते, ही रेती कमी दराने उपलब्ध करून दिल्यास गरीबांसाठी तयार होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसह रस्त्यांच्या कामातही वापरता येईल, असा सल्ला त्यांनी कोळसामंत्री गोयल यांना दिला. 

नागपूरकडे बघताना इर्षा होते - केंद्रीयमंत्री गोयल 
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनामुळे नागपूर देशासाठी मॉडेल ठरतेय. ब्रॉडगेज मेट्रो त्यांच्याच संकल्पनेतून पुढे आली असून नागपूरकडे बघताना ईर्ष्या होते, असे नमुद करीत केंद्रीय रेल्वे व कोळसामंत्री पियूष गोयल यांनी शहराच्या विकासाची स्तुती केली. विजेवरील वाहतुकीबाबत नागपूर देशासाठी प्रेरक ठरत असून संपूर्ण रेल्वेच्या विद्युतीकरणाची कामे सुरू असल्याचे ते म्हणाले. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी 67 हजार कोटींच्या योजना असून महामार्गाशी रेल्वे जोडण्याचा प्रकल्पही समृद्धी मार्गातून सुरू व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. गडकरींच्या सूचनेला हिरवी झेंडी दाखवित त्यांनी कोळसा खाणीतील रेती अल्प दराने वेकोली उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही दिली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Broadgase Metro Railway is a revolutionary step said union minister Nitin Gadkari