"बीएसएनएल' टॉवरचा वीजपुरवठा "कट' 

file Photo
file Photo

कळमेश्वर (जि.नागपूर) : "बीएसएनएल'ने थकीत वीजबिल न भरल्यामुळे कळमेश्वर तालुक्‍यातील धापेवाडा येथील बीएसएनएल टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. येत्या दोन दिवसांत गोंडखैरी येथील बीएसएनएल टावरचे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून मिळाली. धापेवाडा येथील बीएसएनएल टॉवरची वीज कापल्या गेल्याने या टॉवरवरून सुरू असलेली इंटरनेट, मोबाईल सेवादेखील ठप्प झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
"महावितरण'कडून थकीत वीजबिल ग्राहकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी विभागांचादेखील समावेश आहे. अनेक ठिकाणी महावितरणने बीएसएनएलचा वीजपुरवठा बंद केला आहे. कळमेश्वर तालुक्‍यात बीएसएनएलचे 8 टॉवर आहेत. यात कळमेश्वर 3, धापेवाडा 1, गोंडखैरी 1, बाजारगाव 1, मोहपा 1, पानउबाली 1 अशी आकडेवारी आहे. यातील धापेवाडा येथील बीएसएनएल टॉवरचे मे ते ऑगस्ट या चार महिन्यांचे वीजबिल 84 हजार असून गेल्या चार महिन्यांपासून वीजबिल भरण्यात न आल्याने महावितरण कंपनीने टॉवरची वीज जोडणी खंडित केली. गोंडखैरी येथील बीएसएनएल टॉवरचे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचे वीजबिल 2 लाख 80 हजार रुपये असून ते वीजबिल भरण्यासंबंधी बीएसएनएल कार्यालयाला वारंवार नोटीस देण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून कुठलेही उत्तर आलेले नाही. येत्या दोन दिवसांत गोंडखैरी येथील त्या टॉवरचे वीजबिल जर भरले नाही, तर गोंडखैरी येथील टॉवरची जोडणीसुद्धा खंडित करण्यात येईल अशी माहिती, वीज वितरण विभागाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकार पुरस्कृत बीएसएनएल कंपनीच्या वतीने वीजबिल न भरण्यात आल्याने लोकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे. वीजबिल भरण्यात न आल्याने "महावितरण'कडून टॉवरसाठी लावण्यात आलेले वीजमीटरच काढून नेण्यात आले आहे. 

टॉवरचे वीज कनेक्‍शन कापल्या गेल्याबाबतची माहिती मिळाली असून वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. जोपर्यंत वरिष्ठांकडून निधी येत नाही, तोपर्यंत वीजबिल भरता येणार नाही. नेमका निधी केव्हा येणार, हे मी सांगू शकत नाही. 
श्री. गुढे 
उपविभागीय अभियंता 
बीएसएनएल 

वारंवार वीजबिल भरणा संबंधीच्या नोटीस बीएसएनएल विभागाच्या कार्यालयाला देण्यात आल्या. परंतु, त्या नोटीसीचे कुठलेही उत्तर तसेच वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे धापेवाडा येथील बीएसएनएल टॉवरचे विद्युत कनेक्‍शन कापण्यात आले आहे. 
श्री. होनाडे 
उपविभागीय अभियंता 
वीज वितरण कंपनी  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com