विधानसभा निवडणुकीच्या मतांचा संकल्प!

file photo
file photo

नागपूर : आगामी विधानसभेची निवडणुकीत कोणी नाराज होणार नाही याची काळजी घेऊन महापालिकेचे कर्मचारी, व्यापारी, नगरसेवक तसेच विविध समाजाला खुश करणारा 3197.60 कोटींचा महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी आज सादर केला.
कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाची घोषणा, व्यापाऱ्यांच्या थकीत एलबीटीसाठी तसेच अवैध नळ वैध करण्यासाठी "वन टाईम सेटलमेंट' योजना जाहीर करण्यात आली. याशिवाय रस्ते योजनेअंतर्गत प्रत्येक प्रभागासाठी राखीव निधी 60 लाखांवरून 80 लाख करीत नगरसेवकांना तसेच वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या पुतळ्यांची घोषणा करीत विविध समाजालाही खुश करण्याचा प्रयत्न केला. पोहाने यांनी भाषणातून मालमत्ता कराची वसुली होत नसल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईचाही इशारा दिला. महापालिकेचे कर्मचारी सातव्या वेतन आयोगाची सातत्याने मागणी करीत होते. सहाव्या आणि सातव्या आगोच्या थकबाकीचाही वाद सुरू आहे. थकबाकी सुमारे अडीचशे कोटींच्या घरात असल्याने ती देता येणार नाही असे स्पष्ट करून सातवा आयोग जाहीर करण्यात आला. एलबीटीची थकबाकी, त्यावर व्याज, दंडाची एकमुस्त रक्कम भरण्यासाठी "वन टाईम सेटलमेंट' योजनेद्वारे देण्यात आली आहे. याशिवाय अवैध नळ वैध करण्यासाठीही वन टाईम सेटलमेंट योजनेची घोषणा केली.
डझनभर पुतळे व समाजभवन
गुरुदेव सेवा मंडळ, आमदार सुधाकर कोहळे, नगरसेविका रूपाली ठाकूर यांच्या मागणीवरून हनुमाननगर झोनचे नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करण्याचीही घोषणा केली. याशिवाय छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार, पंडित दीनदयाल उपाध्याय, साई वसनशाहजी, छत्रपती शाहू महाराज, स्व. अर्जुनदास कुकरेजा, स्व. भोजसिंग चौधरी, संत चांदुराम साहीब, जनरल मंशरसा आवारी, ना. सु. हर्डीकर, स्व. देवीदास पराते यांच्या पुतळ्याची निर्मिती तसेच डिप्टी सिग्नल, देशपांडे ले-आउट, गरोबा मैदान, शिंगाडा मार्केट दसरा रोड, सुदर्शन भवन बारा सिग्नल, लोधीपुरा, जरीपटका येथे समाजभवन निर्मितीची घोषणा करीत त्यांनी विविध समाजालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. लाडली लक्ष्मी योजना, विद्यार्थ्यांसाठी सायकल बॅंक, वृक्षारोपण व संवर्धन, नदी, तलावांचे पुनरुज्जीवन, दहनघाट, कब्रस्तानचा विकास आदी योजनांचाही समावेश केल्याचे पोहाणे यांनी भाषणातून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com