शब्द पाळा, राममंदिर बांधा ! 

निखिल भुते - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नागपूर - "सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी राममंदिर बांधण्याचा शब्द दिला होता. केंद्र सरकारने आपला शब्दही आता पाळावा,' या शब्दांत ज्योतिष पीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी आज (शुक्रवार) संघभूमीतून सरकारला खडसावले. यावेळी केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते, हे विशेष. 

नागपूर - "सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी राममंदिर बांधण्याचा शब्द दिला होता. केंद्र सरकारने आपला शब्दही आता पाळावा,' या शब्दांत ज्योतिष पीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी आज (शुक्रवार) संघभूमीतून सरकारला खडसावले. यावेळी केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते, हे विशेष. 

महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैनतर्फे आयोजित राष्ट्रीय वेद संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याला शंकराचार्य अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला देवनाथ पिठाचे पिठाधीश जितेंद्रनाथ महाराज, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे, डॉ. किशोर मिश्र, वेदमूर्ती कृष्णशास्त्री आर्वीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सरकारला आठवण करून दिल्यामुळे राममंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "काही दिवस शांत रहा, भविष्यात मंदिर उभारू असे केंद्र सरकार म्हणाले होते. मात्र, अद्याप मंदिर झालेले नाही. मंदिर उभारण्यासाठी खऱ्या अर्थाने हीच योग्य वेळ आहे,' असेही शंकराचार्य म्हणाले. यावर गडकरींनी केवळ हात जोडून स्मितहास्य करीत प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे शंकराचार्यांच्या वक्तव्यावर नितीन गडकरी कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र शंकराचार्यांच्या अध्यक्षिय भाषणानंतर उद्‌घाटन सोहळाच संपला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राजसत्तेला धर्मसत्तेने नेहमीच मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर वेदांमध्ये असून यातूनच शाश्‍वत विकास साध्य होणार आहे.' जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, "संतांना राजकारण नव्हे तर राष्ट्रकारण करायचे आहे. राजसत्तेला संतांची कायम साथ राहणार आहे. मात्र, राजसत्ता चुकल्यास धर्मसत्तेने त्यांना दंड केल्याची परंपरा आपण विसरू शकत नाही.' विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच राममंदिर हा राजकीय विषय नसून ही सामाजिक भावना असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा शंकराचार्यांनी हा मुद्दा छेडला.

रेशीमबाग - विचार मांडताना ज्योतिष पीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, बाजुला जितेंद्रनाथ महाराज, नितीन गडकरी, देवेन्द्र फडणवीस व इतर.

Web Title: build the ram temple