बुलडाणा : कृषी विभागात ठिबक सिंचन घोटाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buldana Drip irrigation scam

बुलडाणा : कृषी विभागात ठिबक सिंचन घोटाळा

सिंदखेडराजा : तालुक्यात कृषी विभागामध्ये ठिबक योजनेमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्यामुळे कृषी विभागांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून संबंधित अधिकृत कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी कृषी विभागामार्फत सिंचनातून समृद्धी आणि पाण्याची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान कृषी योजने अंतर्गत शेतकर्‍यांना ठिबक सिंचन लाभ दिला जातो. योजनेमध्ये लाखो रुपयाचा घोटाळा झाल्याचे पहायला मिळत आहे. कृषी विभागाच्या मोका पहाणीमध्ये घोटाळा उघडकीस आला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कृषी विभागात महाडीबीटी व पोकरा या योजनेच्या अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन लाभ घेण्यासाठी शेकडो शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आले होते. त्याला कृषी विभागाकडून पूर्वसंमती देण्यात आली होती. याच पूर्वसंमतीचा फायदा काही ठिबक विक्रेते व संबंधित शेतकर्‍यांनी आर्थिक फायदा घेण्यासाठी कंपनीचे ऑनलाईन हुबेहूब बिल सादर केले.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना २०२१-२२ अंतर्गत अनुदान वितरणात हा गंभीर प्रकार समोर आला. तालुका कृषी विभागाकडून १४ जुलैला वरिष्ठ कार्यालयाला सदर घटने संदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून तपासणी आदेश देण्यात आले होते. जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांनी २७ जुलैला सुनावणी घेतली होती. सुनावणी मध्ये संबंधित ठिबक विक्रेत्याकडून सुमारे ३५ लाख ७२ हजार ७७१ रुपयांची वसुली करण्याचे निर्देश जिल्हा अधिक्षकांनी दिले होते.

तसेच या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांची चौकशी करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश उपविभागीय कृषी अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. संबधीत विक्रेत्याकडील असलेला ठिबक तुषार सिंचनचा असलेला साठा व विक्री करण्यात आलेला साठा यामध्ये मोठ्याप्रमाणात तफावत आढळून आली असल्याचे कृषी विभागांच्या तपासणीमध्ये निष्पन्न झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे विक्रेत्या बरोबरच संबंधित कर्मचार्‍यांवर काय ? कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोखरा गावातील १७२ शेतकरी रडारवर

घोटाळा झालेल्या ठिबक व तुषार सिंचन अधिकृत विक्रेत्याकडून जवळपास १७२ शेतकर्‍यांनी ठिबक व तुषार सिंचन संच घेतल्याचे सांगण्यात येत आहे तर त्यापैकी जवळपास १०७ शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून रक्कम वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोखरा गावातील शेतकरी सुद्धा चौकशीच्या फेर्‍यांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांची चौकशी केल्यानंतरच खरे सत्य बाहेर येणार आहे. त्यामुळे शेतकरी काय?माहिती देतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशी झाली बनवाबनवी

तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी महाडीबीटीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले. ऑनलाइन सादर केल्यानंतर कृषी विभागातून पूर्वसंमती देण्यात आली. पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकर्‍यांनी संबंधित ठिबक, तुषार विक्रेत्याकडून साहित्य न घेता बिले घेऊन ऑनलाईन अपलोड केली. ऑनलाइन अपलोड केलेले बिले हे कंपनीचे हुबेहूब असल्यामुळे कृषी विभागाकडून रक्कम वितरित करण्यात आली. परंतु, संबंधित विक्रेत्याकडून तसेच संबंधित कंपनीकडून मिळालेल्या साठ्याचा ताळमेळ न आल्यामुळे सदर घोटाळा उघडकीस आला असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात इतरत्रही घोटाळ्याची शक्यता

कृषी विभागातर्फे देण्यात आलेल्या अनुदानासंदर्भात सिंदखेडराजातील घाटोळा समोर आला. परंतु, हीच पद्धत इतरत्रही जिल्ह्यात वापरण्यात आली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारचा घोटाळा होऊन मोठ्याप्रमाणात आर्थिक भ्रष्टाचाराची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये कृषी केंद्र संचालक व अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा सहभागही नाकारता येत नसल्यामुळे याबाबत सविस्तर चौकशीची गरज निर्माण झाली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील ठिबक, तुषार सिंचन योजना अंतर्गत झालेल्या घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हा कृषी अधीक्षक बुलडाणा यांना देण्यात आले आहे.

- एकनाथ डवले, प्रधान सचिव कृषी विभाग, मुंबई

Web Title: Buldana Agriculture Department Drip Irrigation Scam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..