'कोरोना'त बळीराजाच्या कष्टाला आराम नाही, असे आहे त्यांचे दैनंदिन जीवन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे कोरोना बाधित आढळल्याने 21 दिवसाचा लॉगडाऊन हा वाढणार हे स्पष्ट असल्याने विशेषकरून शहरी भागातील जनतेच्या पोटात गोळे उठणे साहजिक आहे.

नांदुरा (जि.बुलडाणा) : सगळे जग सध्या कोरोनाच्या भीतीने चार भिंतीत बंद असून वेळ कसा खर्ची जाईल या विवंचनेत असतांना शेतकरी वर्ग मात्र आजही कोरोनाला दोन हात करून अन्न पिकविण्यासाठी अहोरात्र राब राब राबत आहे. तसेही निसर्गाच्या अवकृपेचे वेळोवेळी चटके सहन करणारा बळीराजा कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी सध्या दिवस निघताक्षणी आपआपल्या कामावर हजर होऊन शेतीमशागतीचे कामे आटपून घेत आहे.

ग्रामीण भागात सध्या पाहिजे त्या प्रमाणात कोरोनाचे संकट गडद नसल्याने व हे संकट आपल्यावर येवुही नये याची पुरेपूर दक्षता बाळगत हा वर्ग दिवसभर शेतात कामातून आपला वेळ खर्चित असल्याने लॉगडाऊनचा परिणाम नसला तरी विक्रीस आलेल्या मालापासून वंचित ठरत आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे कोरोना बाधित आढळल्याने 21 दिवसाचा लॉगडाऊन हा वाढणार हे स्पष्ट असल्याने विशेषकरून शहरी भागातील जनतेच्या पोटात गोळे उठणे साहजिक आहे. कारण या संचारबंदीच्या काळात चार भिंतीत करावे तरी काय असा प्रश्न असल्याने व पोटासाठी दोन पैसे कमविणे गरजेचे असल्याने वाढणारा लॉगडाऊन त्यांचेसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो सावधान, वादळी पाऊस येतोय

दुसरीकडे ग्रामीण भागात सद्या तरी या लॉगडाऊनचे सोयरसुतक कुणाला नसून काही प्रमाणात अडीअडचणी येत असल्या तरी शेजाऱ्यापाजाऱ्याकडून उसनवारीच्या नावाखाली सर्वांची अन्नधान्याची सुबत्तता भागत आहे. एवढेच काय शेतसंबंधी कामानाही वेग असल्याने शेतमजुरांना कामे उपलब्ध असून शेतकरीही राब राब राबून आपला पूर्णवेळ शेतीसाठी लावत आहे. त्यामुळे शेतात राहत असल्याने लॉगडाऊनला यातून बळकटी मिळत असून सामाजिक अंतर व कुणाचेही सोयरसुतक राहत नसल्याने साहजीकच कोरोना रोगाच्या संक्रमणाला आळा बसत आहे.

अनेकांनी तर आपले गावातील बालबिस्तार गुंढाळून शेतातच पाल ठोकून मुक्कामी थांबण्यावर जोर दिला आहे. सध्या शेतात गहू काढणीचा हंगाम जोरात सुरू असून रब्बी मका, भुईमूग व इतर भाजीपाला पिकांना पाणी देण्यासोबतच शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून अनेकांच्या घरात कापूस, धान्य, मका, सोयाबीन, गहू हरभरा पडून असतांना मार्केट बंद असल्याने आर्थिक मंदीचे सावट शेतकऱ्यांत आहे.

माल पडून असल्‍याने आर्थिक चणचण
गहु, हरभरा काढणी सुरु असतांनाच कोरोनाच्‍या संकटाने थैमान घातले त्‍यामुळे ज्‍या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल काढला होता. त्‍यांना बाजाराज जाऊन विकण्याची संधीही मिळाली नाही. त्‍यामुळे आधिच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी  अशा भयानक परिस्‍थितीत अधिक अडचणीत आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buldana,s Farmers are not relaxed in Corona