भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा : तिघांना अटक

श्रीधर ढगे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

या प्रकरणात पोलिसांनी बेटिंग ऐवजी जुगाराचा साधा गुन्हा दाखल केला.

खामगाव (बुलडाणा) : भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग करणाऱ्या तीन सट्टेबाजांना शिवाजी नगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपनीचे मोबाइल हँडसेट, टीव्ही, लैपटॉप, रोख व इतर साहित्य असा 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

येथील गोपाळनगर भागात भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर बेटिंग करुन पैशाची हारजीतचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरुन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रुपेश शक्करगे, पोलीस कर्मचारी सुधाकर थोरात, विशाल कोळी व दीपाली सातव यांनी रविवारी रात्री रामा लाहूडकर याच्या घरी छापा टाकला. यावेळी रामा लाहुडकर, गणेश देशमुख व शुभम पुदागे हे क्रिकेट सामन्यावर बेटिंग करत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्याच्या कडून 10 मोबाइल, एक लैपटॉप, 2 टीव्ही, प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

छोटे मासे गळाला
रविवारी भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर बेटिंग करताना नवखे व छोटे मासे गळाला लागले, म्हणूनच की काय या प्रकरणात पोलिसांनी बेटिंग ऐवजी जुगाराचा साधा गुन्हा दाखल केला. खामगावातील मोठ्या बुकिंवर पोलिस का हात टाकत नाहीत ? हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. खामगाव येथील बुकिंचे अकोला, अकोट, नाशिक व नागपुर प्रर्यन्त नेटवर्क असल्याचे यापूर्वीहीसमोर आले आहे.

Web Title: buldhana marathi news india australia match betting