सातबारा एक, कर्ज 5 बँकांचे : स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाचा पराक्रम

श्रीधर ढगे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

  • साडेचार एकरचा आहे सातबारा
  • विविध राष्ट्रीयकृत बँकांतुन दहा लाख कर्ज

खामगाव (बुलडाणा) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अश्या मागणीसाठी आंदोलने करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी बुलडाणा जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी एकाच सातबाऱ्यावर एक दोन नव्हे तर चक्क पाच बँकाकडून पीक कर्ज घेलते आहे,आणि आता ही पाचही कर्ज माफ कारावी याकरिता त्यांनी ऑनलाईन अर्जसुदधा केला आहे.दरम्यान हा प्रकार भाजपा कार्यकर्त्यांनी समोर आणला असून ' या साठी स्वाभिमानीला हवी कर्जमाफी ' अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकत सडकून टीका केल्या जात आहे.

स्वाभिमानी पक्ष एनडीएतून बाहेर पडला.जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळ सोडले. आता स्वाभिमानीचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक भूमिका घेत आंदोलने करत आहेत.विशेष म्हणजे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्ह्यात सरसकट कर्ज माफीकरिता स्वाभिमानी खूपच आक्रमक आहे.मात्र या आंदोलनात अग्रस्थानी असलेले रविकांत तुपकर यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते तथा युवा आघाडीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी एका सातबाऱ्यावर चक्क पाच बँकाकडून कर्ज घेतले असल्याचे समोर आले आहे.त्यांची साडेचार एकर शेती असून महाराष्ट्र बँक, भारतीय स्टेट बँक व इतर विविध राष्ट्रीय कृत बँकाकडून त्यांनी जवळपास दहा लक्ष कर्ज घेलते आहे. विशेष म्हणजे ही पाचही कर्ज माफ करावीत या करिता त्यांनी ऑनलाइन कर्जमाफीचा अर्ज केला आहे.त्यामुळे आता स्वाभिमानीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार पलटवार सुरू केला आहे.सोशल मीडियावर भाजपा कार्यकर्ते रविकांत तुपकर व श्याम अवथळे यांच्यावर टिका करत आहेत.

मी पाच बँकाकडून कर्ज घेतले ही बाब खरी असली तरी सर्व कर्ज नियमानुसार आहेत. मात्र मी सरकार विरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत असल्याने मला अडचणीत आणण्याचे काम भाजपाकडून होत आहे.हा आंदोलन दडपण्याचा प्रयन्त आहे.
- श्याम अवथळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी युवा आघाडी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्याना शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही.त्यांची आंदोलने प्रसिद्धी आणि स्वार्थ साधन्यासाठी आहेत. स्वतः एका सातबाऱ्यावर पाच बँकाचे कर्ज घेतले असल्याने त्यांना कर्ज माफी हवी आहे. रविकांत तुपकर व त्यांचे कार्यकर्ते काय उद्योग करतात हे आता समोर आले आहे. तेल आणि तूप गेले अशी अवस्था झाल्याने ते सरकारवर बीनबुडाचे आरोप करत आहेत.
- संजय शिनगारे , शहराध्यक्ष, भाजप खामगाव

Web Title: buldhana marathi news swabhimani shetkari five banks loan fraud