बाळ चोरी प्रकरणी पोलिसांना 'क्लू' मिळेना !

श्रीधर ढगे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुले चोरणाऱ्या टोळीतील ही महिला असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली मात्र काही धागे दोरे हाती लागले नाहीत.राज्यासह मध्यप्रदेशमध्ये  शोध सुरू आहे.दरम्यान आरोग्य विभागाने परिचारिका लीलावती खरे यांना निलंबित केलं आहे.

खामगाव (बुलडाणा) : पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाला बुधवार, २७ सप्टेंबरला पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास येथील सामान्य रुग्णालयातून एका बुरखाधारी महिलेने पळवून नेल्याच्या खळबळजनक घटनेला एक दिवस उलटला. मात्र अद्याप या प्रकरणात कोणताही "क्लू" मिळत नसून पोलिसांची शोध मोहिम सुरू आहे. आरोग्य विभागाने परिचारिका लिलावती खरे यांना या प्रकरणात निलंबित केले आहे.

बुधवारी पहाटे बाळ चोरीची घटना उघसकीस आली. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी सुमय्याबी आतिक खान ही महिला पाच दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती झाली होती. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ व बाळंतीण महिलेला वॉर्ड क्रमांक ५ मध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास एक बुरखाधारी महिला इंडिगो कारमधून उतरली. नंतर ती वॉर्ड क्रमांक ५ मध्ये दाखल झाली. सुमय्याबीला झोप लागलेली असल्याचे पाहून आरोपी महिलेने बाळाला उचलून मोठ्या थैलीत घालून नेले. नंतर महिला एका मुलासोबत इंडिगोमधून पसार झाली. रुग्णालयासमोर आलेली इंडिगो, त्यातून उतरलेली बुरखाधारी महिला आणि बाळाला नेतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

नंतर जाग आलेल्या सुमय्याबीला बाळ गायब असल्याचे दिसताच तिच्या काळजाचा थरकाप उडाला. या घटनेची माहिती रुग्णालयात पसरताच एकच गोंधळ उडाला. बाळाचे अपहरण झाल्याची माहिती समजल्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश टापरे तातडीने रुग्णालयात पोहोचले. पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार उत्तम जाधव आपल्या सहकाऱ्यांसोबत दवाखान्यात दाखल झाले आणि तपासकार्य सुरू करण्यात आले. 

मुले चोरणाऱ्या टोळीतील ही महिला असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली मात्र काही धागे दोरे हाती लागले नाहीत.राज्यासह मध्यप्रदेशमध्ये शोध सुरू आहे.दरम्यान आरोग्य विभागाने परिचारिका लीलावती खरे यांना निलंबित केलं आहे. सीसीटीव्ही फुटेज मधील महिलेची ओळख पटलेली नाही.पिडीत महिला व तिचे नातेवाईक सुद्धा फुटेज मधील महिलेस ओळखू शकले नाहीत.त्यामुळे पोलीस तपासला अद्याप दिशा मिळाली नाही. पाच वर्षानंतर पुत्र प्राप्ती झालीं मात्र त्या मातेचे सूख पाच दिवसात हिरावल्या गेले ती अभागी माता आपल्या एकुलत्या एक पोटच्या गोळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

Web Title: Buldhana news police investigate missing child