राजीवनगरातील अतिक्रमणांवर "बुलडोझर'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

हिंगणा  (जि.नागपूर) : नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमणावर सोमवारी बुलडोझर चालविला. 92 घरे जमीनदोस्त करून चाळीस फुटाचा रस्ता मोकळा केला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

हिंगणा  (जि.नागपूर) : नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमणावर सोमवारी बुलडोझर चालविला. 92 घरे जमीनदोस्त करून चाळीस फुटाचा रस्ता मोकळा केला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील राजीवनगर परिसरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हिंगणा मार्गावरील शांतिनिकेतन शाळेपासून झेंडा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यावर लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली. यामुळे रस्ता अरुंद झाला होता. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, वन विभाग व नगर परिषद प्रशासनाने याची दखल घेतली. या मार्गावरील अतिक्रमण करणाऱ्या 92 अतिक्रमीत नागरिकांना नोटीस बजावण्यात आली होती.26 ऑगस्टपर्यंत अतिक्रमण हटवा, अन्यथा अतिक्रमण काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. सोमवारी सकाळी 8 वाजता बुलडोझर घेऊन नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी राजीवनगरात हजर झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शांतिनिकेतन शाळेपासून बुलडोझरच्या साहाय्याने अतिक्रमण हटवणे सुरू झाले. झेंडा चौकापर्यंत जवळपास दीड किलोमीटरचा परिसरातून 92 घरे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे अतिक्रमित झालेला चाळीस फुटाचा रस्ता मोकळा झाला. मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी पुढाकार घेतला. अतिक्रमण हटविताना एमआयडीसी व हिंगणा पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. यावेळी मुख्याधिकारी भारत नंदनवार, अभियंता मुलकलवार, कनिष्ठ अभियंता विजय सुरवसे, कर निरीक्षक विशाल नरवाडे, नरेश गाढवे, देवेंद्र शेंडे,किरण रोगे, हरिदास बारंगे, राजेश झोडे, संजय मेटांगळे, अश्विनी चौरे, रवींद्र बगमारे कुमुद सोनटक्‍के उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण हटविल्याने रहदारीचा मार्ग मोकळा झाला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bulldozer over Rajiv Nagar encroachment