बसची झाडाला धडक, सात जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

अपघातात एसटी बस चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, वाहक भारत खरात यांच्या डोक्याला मार लागला आहे.

मोताळा (जि.बुलडाणा) : धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बसची झाडाला धडक बसली. या अपघातात बस चालकासह सात जण जखमी झाले आहे. सदर घटना धामणगाव बढे ते वाघजाळ फाटा मार्गावरील टाकळी फाट्यानजीक रविवारी (ता.15) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.

बुलडाणा आगाराची एम.एच. 40- 8952 क्रमांकाची बस जामनेरहून बुलडाण्याकडे प्रवाशी घेऊन जात होती. या बसमध्ये चालक पी.एस. रिंढे व वाहक भारत भुजंगराव खरात हे कर्तव्यावर होते. दरम्यान, धामणगाव बढे ते वाघजाळ फाटा मार्गावरील टाकळी फाट्यानजीक या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बसची झाडाला जबर धडक बसली. या अपघातात एसटी बस चालक पी.एस. रिंढे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, वाहक भारत खरात यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर, बसमधील प्रवाशी संदीप पानपाटील (रा. गुळभेली) यांच्यासह चार ते पाच प्रवाशी जखमी झाले. जखमींमध्ये महिला प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा - चराईसाठी आलेल्या 45 मेंढ्यांचा मृत्यू

स्टेअरिंग लॉक झाल्याने घडली घटना
अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात एपीआय राहुल जवंजाळ, एएसआय नंदकिशोर धांडे, पोकाँ अभिनंदन शिंदे, चालक एएसआय शेख मुस्तकीम, होमगार्ड अमोल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी 108 क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेतून बुलडाणा रवाना केले. एसटी बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने अपघात घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

अवश्य वाचा - अकोल्यातील तब्बूस अटक

चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
एसटी बसची झाडाला जबर धडक बसल्याने बसचा समोरील भाग चुराडा झाला. त्यामुळे बसचालक पी. एस. रिंढे बसमध्ये फसले होते. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. चालकाच्या बाजूने बसचा चुराडा झाल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी बोराखेडी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनी जवळपास अर्धा तास शर्तीचे प्रयत्न करून जखमी बसचालकाला बसमधून बाहेर काढले व तत्काळ उपचारासाठी रवाना केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bus hit the tree, seven were injured