झिंगे झाले स्वस्त; कोरोना आणि नवरात्रीमुळे मागणीत घट; व्यवसायाला फटका

नीलेश झाडे 
Tuesday, 20 October 2020

झिंगे मोठ्या प्रमाणावर सापडूनही भाव मिळत नाही. झिंग्याला मिळणाऱ्या अल्पभावामुळे झिंगे पकडणे बंद झाल्याचे चित्र गोंडपिपरी तालुक्‍यातील वर्धा नदीचा घाटावर बघायला मिळत आहे.

धाबा (जि. चंद्रपूर) ः नवरात्रीचा आजचा चौथा दिवस. कोरोनाचा फटका नवरात्र उत्सवाला बसला. दुसरीकडे नवरात्र उत्सवाचा फटका मासेमारीला बसला आहे.नवरात्रीत अनेकजण उपवास पकडतात. मांसाहार बंद असतो. याचा परिणाम झिंगा विक्रीवर झाला आहे.सहाशे ते सातशे प्रति किलो विकला जाणारा झिंगा आज चारशे रुपये प्रती किलो विकला जात आहे.

झिंगे मोठ्या प्रमाणावर सापडूनही भाव मिळत नाही. झिंग्याला मिळणाऱ्या अल्पभावामुळे झिंगे पकडणे बंद झाल्याचे चित्र गोंडपिपरी तालुक्‍यातील वर्धा नदीचा घाटावर बघायला मिळत आहे.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

गोंडपिपरी तालुक्‍याला वर्धा-वैनगंगा नदीने वेढा दिला आहे. तालुक्‍यातील नदीपात्रात अनेक डोह आहेत. या नदी पात्रातील ताजी मासोळी, झिंग्यांना जिल्ह्यात मागणी आहे. येथील मासोळी, झिंगा खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असते. या नदीपात्रातील झिंगे चंद्रपूर जिल्ह्यात आणि लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे विक्रीला जातात. 

ताजे झिंगे असल्याने त्यांना बाजारात भाव चांगला मिळत असतो. प्रति किलो सहाशे ते सातशे रुपये झिंगे विकले जातात. भाव अधिक असतानाही खवय्ये झिंगे घेण्यासाठी तुटुन पडतात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आणि गडचिरोली, तेलंगणा येथील मासेमारी करणारे वर्धा नदीचा विविध घाटावर मुक्कामाने मासेमारीसाठी येत असतात.

सध्या नवरात्री उत्सव सुरू  आहे.या उत्सवादरम्यान अनेकजण श्रद्धेने उपवास करतात. या उत्सवादरम्यान भाविक मांसाहार टाळतात. याचा फटका झिंगा विक्रीला बसला आहे. सहाशे ते सातशे रुपये प्रति किलो विकला जाणारा झिंगा आज चारशे रुपये प्रति किलोने विकला जात आहे. ग्राहक मिळाले नाहीत तर तीनशे ते तीनशे पन्नास रुपयाने झिंगे विकले जात आहेत. भाव कोसळल्याने मासेमाऱ्यांनी झिंगे पकडणे कमी केले आहे.दुसरीकडे नदी पात्रात पकडलेल्या मासोळ्यांना ग्राहक मिळत नसल्याने मासेमारीवर संक्रात आली आहे.

जिल्ह्यातील आणि लगतचा तेलंगणातील खवय्ये मासोळीसाठी पोडसा पुलावर गर्दी करीत होते. मात्र, नवरात्र सुरू  झाल्यापासून गर्दी ओसरली आहे.मासोळी खरेदी करण्यासाठी ग्राहक मिळत नसल्याचे चित्र पोडसा घाटावर आहे.

अधिक वाचा - सोन्याला झळाळी; साठ हजारांचा आकडा करेल पार, ग्राहकांची पावले वळू लागली दुकानांकडे

सध्या मासोळी आणि झिंग्याला ग्राहक मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे सहाशे प्रति किलो विकला जाणारा झिंगा चारशे रुपये किलोने विकावा लागत आहे.
प्रदीप श्‍यामराव शेरकी ,
 मासेमार किरमिरी.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: business of prawns get affected due to corona and navratri