पोटनिवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सरशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

भंडारा : पालांदूर व ब्रह्मी या दोन जिल्हा परिषद क्षेत्रात सदस्य पदासाठी रविवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. या दोन्ही जागांवर अनुक्रमे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी विजयी मोहर उमटवली. पालांदूर येथील जागा ही पूर्वी भाजपच्या ताब्यात होती. ती जागा कॉंग्रेसने हिसकावली आहे. येथे कॉंग्रेसच्या बिंदू महेशकुमार कोचे यांनी भाजपच्या रजनी नंदागवळी यांचा पराभव केला. ब्रह्मी क्षेत्राची जागा ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. ही जागा कायम राखण्यात यश आले.

भंडारा : पालांदूर व ब्रह्मी या दोन जिल्हा परिषद क्षेत्रात सदस्य पदासाठी रविवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. या दोन्ही जागांवर अनुक्रमे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी विजयी मोहर उमटवली. पालांदूर येथील जागा ही पूर्वी भाजपच्या ताब्यात होती. ती जागा कॉंग्रेसने हिसकावली आहे. येथे कॉंग्रेसच्या बिंदू महेशकुमार कोचे यांनी भाजपच्या रजनी नंदागवळी यांचा पराभव केला. ब्रह्मी क्षेत्राची जागा ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. ही जागा कायम राखण्यात यश आले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांचे चिरंजीव चेतक डोंगरे यांनी भाजपचे उमेदवार द्रौपद धारगावे यांना धूळ चारून विजयश्री खेचून आणला. गेल्या 32 वर्षांपासून पालांदूर जिल्हा परिषदेत भाजपचा उमेदवार विजयी होण्याची परंपरा होती. मात्र, यावेळी कॉंग्रेसच्या बिंदू कोचे यांच्या रूपाने कॉंग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट दिसून आली. अशा परिस्थितीत भाजपने येथील उमेदवाराच्या विजयासाठी कुठलीही कसर सोडली नाही. तरीही भाजपच्या उमेदवार रजनी नंदागवळी यांना हार पत्करावी लागली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेससाठी हे शुभसंकेत असून मरगळ आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे.
पालांदूर येथे सरपंच तसेच चार व पाच या प्रभागाच्या ग्रामपंचायत सदस्यपदासाठीसुद्धा पोटनिवडणूक घेण्यात आली.यात पंकज (धम्मा) दिलवर रामटेके यांनी केशव श्रीराम कुंभरे यांना 565 मतांनी पराभूत करून सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला. अतिक्रमण केल्याच्या कारणावरून ग्रामपंचायत सरपंच तथा दोन सदस्यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे रिक्तपदासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. पंकज रामटेके यांना 1 हजार 623 मते मिळाली. भाजप समर्थीत केशव कुंभरे यांना 1 हजार 58 मते मिळाली. सदस्य पदासाठी अंतकला कापसे यांनी नलू मेश्राम यांना मात देत 20 मतांनी विजय प्राप्त केला. आश्‍विन थेर यांनी राधेश्‍याम नंदनवार यांना 230 मतांनी पराजित केले.पवनी तालुक्‍यातील ब्रह्मी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चेतक डोंगरे यांनी भाजपचे द्रौपद धारगावे यांना मात दिली. या क्षेत्राचे प्रतिनिधित्व जि.प.उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्याकडे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र चेतक डोंगरे हे राष्ट्रवादीतर्फे उभे होते. चेतक डोंगरे यांनी 3हजार 610 मतांनी विजय मिळवून ही जागा राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश मिळविले. चेतक डोंगरे यांना 7 हजार 87 मते मिळाली. द्रौपद धारगावे यांना 3 हजार 477 मते मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the bye-election, the Congress, NCP's victory