वाघाने मारला गोऱ्ह्यावर ताव

file photo
file photo

कोदामेंढी (जि.नागपूर) : मौदा तालुक्‍यातील शिवाडौली शिवारात महिनाभरापासून वाघाची दशहत पसरली आहे. शुक्रवारला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वाघाने एका जनावरावर हल्ला करून त्याला फस्त केल्याची घटना घडली. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये भिती आणखीच वाढली आहे.

महिन्यात सावंगी येथील पंडित मोहुर्ले यांना एका पऱ्हाटीच्या शेतात वाघ दिसून आला होता. त्यानंतर आणखी काही जणांनीही वाघ दिसल्याची माहिती दिली. वनविभागाने शिवारात तपासणी केली असता, वाघाच्या पायाच्या खुणा आढळून आल्या होत्या. तेव्हापासून वनविभागाने या भागात गस्त घालणे सुरू केली होती. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावले होते. शिवाडौली, सावंगी, आसोली, बेरडेपर आणि खापरखेडा (जं.) या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन रात्रीला कुणीही गावाच्या बाहेर जाऊ नये असेही सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेरे लावले
शिवाडौली येथे गावात स्वच्छता राहावी यासाठी जनावरे गावाबाहेर बांधतात. येथील तुळशीराम कुंभरे यांनी सूर्य मावळण्याची पूर्वी जनावरे झोपडीच्या बाहेर बांधून ठेवले. तुळशीराम सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दूध काढण्याकरिता आणि जनावरे झोपडीत बांधण्याकरिता गेला असता त्याला एक गोऱ्हा दिसला नाही. त्यामुळे त्यांची चिंता वाढली. काही अंतरावर शोधले असता जनावर मृत अवस्थेत आढळून आले. याची वनविभागाला माहिती दिली. गोऱ्ह्याला वाघाने फस्त केल्याची वनविभागाच्या पाहणीत आढळून आले. तुळशीराम कुंभरे यांचे जवळपास चाळीस हजारांचे नुकसान झाले. निरीक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे टॅपवर ठेवले आहेत.
.
दोन बिबट दिसले
पारशिवनी : तालुक्‍यातील कोंढासावळी येथे शुक्रवारी एका वाघाने दोन जनावरांची शिकार केल्याची घटना समोर आली होती. शिकारीच्या ठिकाणी वाघाचे पगमार्ग दिसल्याने नागरिकांत दहशत वाढली होती. आता पारशिवनीनजीक शनिवारी शेकऱ्यास बिबट दिसल्याने भीतीमध्ये आणखी वाढ झाली आहे. वनविभागाने शिकार केलेल्या जनावरांचा पंचनामा केला. येथेच जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. महिला कापूस वेचणीला जात नसल्याचे सांगण्यात आले.

बंदोबस्ताची मागणी
शुक्रवारी रात्री पारशिवनी येथील शेतकरी संजय नरड व इतर शेतकरी ओलीत करण्यासाठी जात असताना त्यांना दोन बिबटे शेतात दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांनी रात्री शेतात जाणे टाळले आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com