
541 ग्रामपंचायतींच्या 4 हजार 452 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 2214 मतदान केंद्र राहणार असून 19 हजार 416 निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नामांकन मागे घेण्याच्या दिवशी 1215 जणांनी मैदान सोडल्यानंतर आता 11 हजार 353 जण मैदानात उरले आहेत.
अमरावती : ग्रामीण भागात राजकीय धुराळा उडवून देणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे 48 तास शिल्लक राहिले आहे. आज संध्याकाळी प्रचारतोफा थंडावणार असून त्यानंतर छुप्या प्रचारावर भर राहणार आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी उमेदवारांना चांगलाच घाम फुटला आहे.
यापूर्वी 12 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता 4 हजार 784 सदस्यपदांसाठी 11 हजार 353 उमेदवार मैदानात आहेत. शुक्रवारी (ता.15) मतदान होणार आहे.
541 ग्रामपंचायतींच्या 4 हजार 452 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 2214 मतदान केंद्र राहणार असून 19 हजार 416 निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नामांकन मागे घेण्याच्या दिवशी 1215 जणांनी मैदान सोडल्यानंतर आता 11 हजार 353 जण मैदानात उरले आहेत. 18 जानेवारीला मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षण काढले जाणार आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षीच जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने त्याचीच ही रंगीत तालिम असल्याचे चित्र दिसून येते.
बिनविरोध ग्रामपंचायती
भानखेडा, सावंगा, नांदसावंगी, सातरगाव, पिंपरी निपानी, सुलतानपूर, ठाणाठुणी, येरड, काशीखेडा, निंभोरा बोडखा, दर्याबाद, वडुरा.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 100 गावांमध्ये 60 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये 81 इमारती असून 226 बूथ आहेत. 26 गावे संवेदनशील असून त्या गावांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार आहे. 112 बूथ संवेदनशील आहेत. आदर्श आचारसंहितेचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही, याबाबत उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
कोविडसंबंधी खबरदारी
मतदानकेंद्रांवर कोविडसंबंधी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यानुसार मतदानकेंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी वर्तुळ आखण्यात येणार आहे. शिवाय मतदानकेंद्रामधील खोलीत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी फेसमास्क, फेसशिल्ड तसेच सामाजिक अंतर राखण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ