हीच का ती हागणदारीमुक्‍ती ?

थडीपवनी ः गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर जागोजागी घाण दिसून येते.
थडीपवनी ः गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर जागोजागी घाण दिसून येते.

नागपूर  : जिल्हयात अनेक गावे हागणदारीमुक्‍त झाल्याचे शासन प्रशासनाने जाहीर केले. काही गावांना हागणदारीमुक्‍तीचा पुरस्कारही प्राप्त झाला. परंतु "पुन्हा येरे...मागल्या' अशी स्थिती लवकरच पहावयास मिळत आहे. गावांमध्ये अस्वच्छता, घाण, दुर्गंधी, डासांचे साम्राज्य वाढले असून यातून साथीच्या आजारांची लागण होणे क्रमप्राप्त आहे. अशावेळी ही कसली हागणदारीमुक्‍ती, असा प्रश्‍न पडणे साहजिकच आहे.

नागतरोली ग्रा.पं.चे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
भिवापूर : गावात घाण व कचरा वाढून ग्रामस्थांचे आरोग्य बिघडू नये, यासाठी शासन कोटयवधींचा निधी खर्च करून गावा गावात स्वच्छता अभियान राबवत आहे. तर दुसरीकडे ग्रा.पं.च्या निष्काळजीपणामुळे गावात कचरा व घाणीचे साम्राज्य वाढत असल्याचे चित्र काही ठिकाणी बघायला मिळते. नागतरोली गावात असाच काहीसा प्रकार सुरू आहे. कचरा टाकण्यसाठी गावात सहा ठिकाणी कचराकुंड्‌या लावण्यात आल्यात. या कचराकुंड्‌यात गोळा झालेला कचरा भरून गावाबाहेर नेऊन टाकण्यासाठी ग्रा.पं.कडे कचरागाडी पण उपलब्ध आहे. परंतु ग्रा.पं.च्या निष्क्रियतेमुळे कचरागाडी शोभेची वस्तू ठरली आहे. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्‌या कच-याने भरल्यात, मात्र त्यातील कचरा कचरागाडीद्वारे नियमित गावाबाहेर नेल्या जात नसल्याने त्यातून दुर्गंधी पसरत असल्याची गावकऱ्यांची ओरड आहे. कचराकुंड्‌यांच्या आजूबाजूला कचरा साचून तो सभोवताल पसरत असल्याचे चित्र गावात ठिकठिकाणी बघायला मिळते. अशीच स्थिती राहिल्यास भविष्यात गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो.

अभियान फक्‍त नावापुरतेच; गावात अस्वच्छतेचे भंडा

थडीपवनी ः नरखेड तालुक्‍यातील थडीपवनी गावाला चोहोबाजूने मुख्य रस्ते आहेत. हे गाव परिसरातील सर्वात मोठे गाव. हागणदारीमुक्त गाव म्हणून या गावाला पुरस्कार मिळाला आहे. परंतु कुठल्याही रस्त्याने गावात प्रवेश करीत असाल तर आपल्याला सद्यःपरिस्थितीत या गावाचे नवल वाटते. गावातील अंगणवाडीला लागून गावातील किळसवाणा प्रकार लक्षात येतो. इतकेच नव्हे तर गावातील उकिरडे ऐन गावातच असल्यामुळे डास अतिप्रमाणात आढळून येतात. एवढे असूनही स्वच्छतेकरिता संबंधित खात्याने किंवा स्थानिक प्रशासनाने कोणालाही समज नोटीस दिली नाही. याचाच अर्थ या घाणीला प्रोत्साहित कोण करतो, हे लक्षात येते. गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याजवळ प्राथमिक शाळा, अंगणवाडी, बालवाडी, पाण्याची टाकी, आठवडी बाजार, बसथांबा, दोन सभागृह या सर्वांना एकच संरक्षण भिंतीने वेढा घातला असून यात कुठलेही स्वच्छतागृह किंवा प्रसाधनगृह आदीचे मुळीच नियोजन नाही. परिसरातील घाण साफ होण्याकरिता सोय नाही. परिणामी शाळकरी मुलांवर याचा परिणाम होणे साहजिक आहे. सांडपाणी बाहेर जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी नाल्या नाहीत. शोषखड्‌डे घरोघरी देण्यात आलेले होते. परंतु पाणी कुठे मुरते, याचा शोध घेणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी सिमेंट रस्त्याचा वापर गुरे-ढोरे बांधण्यासाठी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मागील काही वर्षांत 9 लाख रुपये खर्च करून स्मशानभूमी रस्ता फक्त पन्नास ते साठ फूट तयार करण्यात आला. हे गाव स्वच्छ कधी होईल, हाच प्रश्न गावकऱ्यांना आता सतावत आहे.

चिकणा ग्रामपंचायतीला तीन लाखांचा पुरस्कार
कुही ः तालुक्‍यातील चिकणा ग्रामपचायतीची स्वच्छ ग्रामपुरस्कारासाठी विभागीय स्तरावरील चमूने नुकतीच भेट दिली. यापूर्वी चिकणा ग्रामपंचायतला तालुक्‍यात प्रथम पन्नास हजार रुपये तर जिल्हयातून दुसरा क्रमांक मिळाला असून तीन लाखांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छ स्वच्छ ग्रामविभागीय तपासणी चिकना येथे नुकतीच करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com