प्रचाराचा धुराळा

file photo
file photo

नागपूर : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वच उमेदवार प्रयत्न करीत असून, आज रविवारी सर्वच मतदारसंघात रॅली, पदयात्रा, भेटीगाठीवर भर देत उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविला. नोकरदारांची सुटी असल्याने उमेदवारांनी प्रत्येकापर्यंत पोहोचून निवडून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे शहरातील बहुतेक वस्त्यांतील अरुंद रस्ते नेते, कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलले होते.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी बंद होणार आहे. प्रचारासाठी एकच आठवडा असून, आजचा रविवार उमेदवारांसाठी पर्वणी होता. त्याचा लाभ घेत सर्वपक्षीय, अपक्ष उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा, रॅली काढली. आज मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांनी कालपासूनच कार्यकर्त्यांची फळी तयार केली. सकाळपासूनच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी ठरावीक ठिकाणी हजेरी लावली. सकाळी दहानंतर खऱ्या अर्थाने शहरातील सहाही मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी जाटतरोडी, रामबाग, इमामवाडा भागात प्रचार करीत मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दक्षिण-पश्‍चिममधील हिंगणा रोडवरील एचपी पेट्रोल पंपापासून मनपातील सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्या नेतृत्वात पदयात्रा निघाली.
लुंबिनीनगर, राजेंद्रनगर, विनायकनगर, संत गाडगेनगर, जयताळा रोड परिसर, अहिल्याबाईनगर, बागानी ले-आउट, हिरणवार ले-आउट, अष्टविनायकनगर, प्रसाद नगर, केशव माधवनगर, दुबे ले-आउट परिसरात पदयात्रेद्वारे संदीप जोशी यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत मुख्यमंत्र्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. भाजपचे मोहन मते यांनी दक्षिण नागपुरातील बालाजीनगर, अयोध्यानगर, जंबुद्वीपनगर, नवीन सुभेदार, जुना सुभेदार, जवाहरनगर, रघुजीनगर क्वार्टर आदी भागात पदयात्रा काढून मतदारांसोबत संपर्क साधला. अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनीही दक्षिण नागपुरातील प्रमुख रस्त्यावर रॅलीद्वारे मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. पश्‍चिम नागपुरात भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख, कॉंग्रेसचे विकास ठाकरे यांनीही मतदारांच्या भेट घेतली. उत्तर नागपुरात कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत, भाजप उमेदवार आमदार डॉ. मिलिंद माने यांनी मतदारांचे लक्ष वेधले. मध्य नागपुरात आमदार विकास कुंभारे, कॉंग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनीही विविध भागात मतदारांपर्यंत पोहोचून मतांचा जोगवा मागितला. पूर्व नागपुरात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे, कॉंग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी वस्त्यांमध्ये पदयात्रेतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
आठवडाभर रणधुमाळी
प्रचारासाठी शेवटचा आठवडा असून, विविध पक्षांचे नेते नागपुरात प्रचारासाठी येणार आहेत. उद्या, 14 ऑक्‍टोबरला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल तीन मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी येतील. बसप नेत्या मायावती उत्तर नागपुरातील इंदोरा मैदानावर प्रचारसभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दक्षिण नागपुरातील प्रचारसभेला येतील. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या, सोमवारी सकाळी साडेसात वाजता मुंबईवरून नागपुरात येत आहेत. त्यांच्या विदर्भात दोन प्रचारसभा असून, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वणीकडे प्रचारसभेसाठी जातील. त्यानंतर ते पुन्हा नागपूरला येणार असून, विमानतळावरून पुण्याकडे रवाना होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com