Vidhan Sabha 2019 नाथाभाऊंच्या इशाऱ्याकडे उमेदवारांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

बुलडाणा : विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणाला अधिक महत्त्व दिले जाते. जवळपास 28 ते 30 हजार लेवा पाटील समाजाचे निर्णायक मतदार या मतदारसंघात आहेत. राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे ज्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतील त्याच उमेदवाराला लेवा पाटील समाज मतदान करीत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. या निवडणुकीतही नाथाभाऊ ज्या उमेदवाराकडे इशारा करतील त्याच उमेदवाराकडे ते मतदार वळतील असे चित्र आहे. असे असले तरी सर्व उमेदवार नाथाभाऊ माझ्याच पाठीशी असल्याचे सांगत असल्याचे दिसून येत आहे.

बुलडाणा : विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणाला अधिक महत्त्व दिले जाते. जवळपास 28 ते 30 हजार लेवा पाटील समाजाचे निर्णायक मतदार या मतदारसंघात आहेत. राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे ज्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतील त्याच उमेदवाराला लेवा पाटील समाज मतदान करीत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. या निवडणुकीतही नाथाभाऊ ज्या उमेदवाराकडे इशारा करतील त्याच उमेदवाराकडे ते मतदार वळतील असे चित्र आहे. असे असले तरी सर्व उमेदवार नाथाभाऊ माझ्याच पाठीशी असल्याचे सांगत असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघात यंदा उमेदवार जुनेच असले तरी तीन उमेदवारांच्या पक्षासोबत जातीय समीकरणेही बदलली आहे. गेल्या निवडणुकीतील मनसेचे उमेदवार संजय गायकवाड यांना शिवसेनेकडून संधी देण्यात आल्याने तीन वेळा आमदार राहिलेले शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून वंचितचा झेंडा हाती घेतला आहे. तर मतदारसंघ भाजपला न सुटल्याने मागील निवडणुकीतील भाजपचे उमेदवार योगेंद्र गोडे हे नाराज होऊन अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तसेच कॉंग्रेसने विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. यामुळे येथे चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 2014 च्या निवडणुकीतही हेच उमेदवार एकमेकांसमोर उभे होते. मात्र, पक्ष वेगवेगळे होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दिग्गज नेत्यांच्या सभांचादेखील जोर वाढला आहे.
या मतदारसंघात मराठा, मुस्लिम, बौद्ध, माळी यासोबत लेवा पाटील समाजाचेही मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. येथील लेवा पाटील मतदारांमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे सन्मानाचे स्थान आहे. नाथाभाऊंच्या निर्णयावर लेवा समाजातील मतदार वळतील असा अंदाज आहे. मात्र, यंदा मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथराव खडसे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारून त्यांची कोंडी केली आहे. येथून त्यांची मुलगी रोहिणी खडसे खेवलकर यांना तिकीट दिले. तरी त्यांच्या समर्थकांची नाराजी कायम आहे. या ठिकाणी शिवसेनेने बंडखोरी केली आहे.

नाथाभाऊंचे समर्थन असल्याचा सर्वांचाच दावा
अपक्ष उमेदवार योगेंद्र गोडे यांचे व नाथाभाऊंचे कौटुंबिक संबंध आहेत. यासोबत गोडे यांनी गेल्या निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळण्यापासून ते सर्व कार्य नाथाभाऊंच्या सल्ल्यावरून केले. या निवडणुकीतही त्यांनी नाथाभाऊंचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर विजयराज शिंदेही त्यांचे जुने सहकारी आहेत. त्यांचेही नाथाभाऊंसोबत घनिष्ठ संबंध आहेत. तसेच हर्षवर्धन सपकाळही नाथाभाऊ मला मदत करणार असल्याचे सांगत आहे. संजय गायकवाड यांचे नाथाभाऊंसोबत फारसे संबंध नाही. तरी गायकवाड हे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार असल्याने त्यांनी खडसे यांच्याकडे प्रचारार्थ बुलडाणा मतदारसंघात येण्याची विनंती केली. मात्र, मुक्ताईनगर मतदारसंघात खडसेंच्या मुलीच्या विरोधात शिवसेनेचा बंडखोर उमेदवार उभा आहे. शिवसेनेकडून या बंडखोरावर कारवाई केल्या जात नसल्याने खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे मी बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदाराचा प्रचार कसा करावा? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या घडामोडींमध्ये सर्व उमेदवार नाथाभाऊ मलाच मदत करीत असल्याचा कांगावा करत असले तरी नाथाभाऊ कोणत्या उमेवाराकडे इशारा करतात यावर 30 हजार लेवा मतदारांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: candidate is waiting for eknath khadse's order