शौचालय सापडत नाही? 'गुगल मॅप' आहे ना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वच्छतेसोबत शहराला पूर्णपणे हागणदारीमुक्त करण्यावर भर दिला आहे. ओडीएफ प्लस प्लस मानाकंनासाठी शहरातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांना दर्जेदार सुविधा देण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे.

नागपूर : महापालिकेने हागणदारीमुक्तीचे सर्वोच्च मानांकनासाठी धावपळ सुरू केली आहे. शौचालयाच्या 100 मीटर परिसरात फलक लावण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील शौचालये 'गुगल मॅप'वर 'एसबीएम टॉयलेट नावाने दिसणार आहे. 
स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वच्छतेसोबत शहराला पूर्णपणे हागणदारीमुक्त करण्यावर भर दिला आहे. ओडीएफ प्लस प्लस मानाकंनासाठी शहरातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांना दर्जेदार सुविधा देण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणारे अधिकारी आयुक्तांच्या 'रडार'वर आहेत. नुकताच स्वच्छता सर्वेक्षणावर आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याशिवाय या बैठकीत शहरातील पर्यावरणवादीही उपस्थित होते. या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण हे चार प्रमुख मुद्द्यांवर अवलंबून आहे. शहराला 'ओडीएफ प्लस' मानांकन मिळाले आहे. आता शहराला 'ओडीएफ प्लस प्लस' हे मानांकन मिळावे यासाठी मनपा प्रयत्न करीत आहे. शहरातील सर्व सार्वजनिक व सामूदायिक शौचालये हे स्वच्छ ठेवण्यासाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना 'टिप्स' दिल्या. आता शहरातील प्रत्येक शौचालयामागे एक नोडल अधिकारी, जमादार, स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सर्वांवर झोनल अधिकारी व सहायक आयुक्तांनी लक्ष ठेवणार आहेत. नागरिकांना शौचालये तत्काळ दिसून यावी, यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. गुगल मॅपवर शहरातील शौचालये दिसल्यास नागरिकांना त्याचा लाभ होईल. शौचालयात अभिप्राय नोंदविण्यास नोंदवही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व शौचालये ही गुगल मॅप वर एसबीएम टॉयलेट या नावाने दिसेल यासाठी प्रयत्न करावे, असेही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 24 तास निरिक्षक, सफाई कामगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शौचालयातील नळाला पुरेशा पाण्यासाठी जलप्रदाय विभागाकडून व्यवस्था करून घेणे, शौचालय स्वच्छ केल्यानंतर फरशी ओली राहता कामा नये, ती कोरडी करणे, शौचालयातील आरसे हे सुस्थितीत ठेवणे, प्रत्येक शौचालयात कचरा पेटी ठेवण्याबाबतही आयुक्तांनी 'टिप्स' दिल्या. पाणी गळतीची जागा शोधून त्याठिकाणी डागडूजी करण्याबाबत शौचालयात उपस्थिती पत्रक लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शौचालयातील अतिक्रमण तातडीने काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

शौचालयांमध्ये रुम फ्रेशनर, हॅंड ड्रायर 
सार्वजनिक शौचालये व सामूदायिक शौचालयांपैकी 25 शौचालये ही बेस्ट स्वरूपाची आहेत. यात बाथरूमसह रूम फ्रेशनर, हॅंड ड्रायर, महिलांसाठी सॅनीटरी नॅपकीन, डिटरमीनेशन्स मशीन्स राहणार असून त्यावर बायो मेडिकल वेस्ट असे स्पष्टपणे लिहून लक्ष वेधन्यात येणार आहे. शौचालय परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Can't find the toilet? go Google Map