esakal | गोरेगावात आता हा बाजार भरणार...पशुपालक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात खरीप हंगाम सुरू होण्याच्या दृष्टीने अटी व शर्तीनुसार गुरांचा बाजार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांनी 17 जूनला सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीला एका पत्राद्वारे दिले

गोरेगावात आता हा बाजार भरणार...पशुपालक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू झाल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात साप्ताहिक गुरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. मात्र पावसाळ्याचे दिवस, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेसह आता नियमित गुरांचा बाजार समिती यार्डात सुरू करण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात खरीप हंगाम सुरू होण्याच्या दृष्टीने अटी व शर्तीनुसार गुरांचा बाजार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांनी 17 जूनला सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीला एका पत्राद्वारे दिले होते. बाजार समिती सभापती, सचिव यांनी समितीच्या यार्डात गुरांचा बाजार भरविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांना पत्र पाठविले होते.

त्याअनुषंगाने सरकारला शिफारस करण्यात आली असता शासनाच्या निर्देशानुसार अटी, शर्तीनुसार साप्ताहिक गुरांचा बाजार सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

बाजारात ही काळजी घ्यावी लागणार

सर्व घटकांना हात धुण्यासाठी बाजार समितीच्या आवारात पुरेशा प्रमाणात पाण्याची नळाची व्यवस्था करणे, हॅण्डवॉश, सॅनिटाइझर उपलब्ध करून देणे, चेहऱ्यावर मास्क लावतील याकडे बाजार समितीने लक्ष घालणे, बाजारात वावरणाऱ्या व्यक्ती 3 फूट अंतरावर राहतील. तसेच जनावरे यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत लक्ष घालणे, सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधक करण्यात यावे, थर्मल टेंपरेचर स्कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्यात यावे, ठराविक प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात यावे, स्वच्छतागृहाची वेळोवेळी स्वच्छता करून निर्जंतुक करावे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी गुरांच्या बाजारास वेळोवेळी भेट देऊन अंमलबजावणीबाबत कार्यालयास अवगत करावे, निर्देशानुसार कामकाज करण्याची जबाबदारी सचिव बाजार समिती यांची राहणार आहे. या अटी व शर्तीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात साप्ताहिक गुरांचा बाजार बुधवारी सुरू करण्यात आला आहे.

जाणून घ्या : सरकारचा ग्राम पंचायतींवर मर्जीतील व्यक्तीच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

नियमावलीचे पालन करा
शेतकऱ्यांनी आपापली जनावरे खरेदी, विक्री करण्यासाठी बाजार समिती यार्डात आणावी. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.
- आशीष बघेले, सचिव, बाजार समिती, गोरेगाव.

loading image