राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची सावध भूमिका 

टीम ई सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

> सर्वांच्या भुवया उंचावल्या 
> चाललयं तरी काय? 
> कोणताही नेता स्पष्टपणे बोलायला तयार नाही 
> आता समोर काय होणार, असा प्रश्‍न 

नागपूर : कालपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे सरकार स्थापन होईल असे चित्र होते. तसेच मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याचे सांगितले जात होते. खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची निवड केल्याचे सांगितले होते. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मात्र, शनिवारची पहाट सर्वांसाठी आश्‍चर्यकारक ठरली. सकाळी आठ वाजताच्या सुमारास भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रिपदी अजिप पवार यांची निवड करण्यात आली. मात्र, या सत्ता स्थापनेला राष्ट्रवादीची मान्यता नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे "चाललयं तरी काय?' असा प्रश्‍न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. 

या सरकार स्थापनेला शरद पवार यांची मान्यता नसल्याची माहिती आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आपल्या बाजूला असलेल्या 35 आमदारांच्या बळावर सरकार स्थापन केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता समोर काय होणार असाच प्रश्‍न राजकारण्यांसह सर्वसामान्यांना पडत आहे. मात्र, या विषयावर कोणताही नेता स्पष्टपणे बोलायला तयार नाही. सर्वांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. 

आम्ही शरद पवारांसोबत 
आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहणार आहे. अजित पवार यांचा निषेघ करतो. महाराष्ट्राची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. 
- राजीव कक्कड, 
शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, चंद्रपूर

मी पक्षासोबत 
मी पक्षासोबत आहे. शरद पवार साहेब यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुढची भूमिका ठरेल. 
- अनिल देशमुख, 
आमदार, काटोल

स्थिर सरकारसाठी घेतलेला निर्णय
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्थिर सरकारसाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळणे आवश्‍यक आहे. आता राष्ट्रपती राजवट हटल्याने शेतकऱ्यांना मदत मिळेल. 
- आशीष मानकर, 
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस.

पक्षाचा निर्णय मान्य 
पक्ष जो निर्णय घेणार तो मान्य राहील. सत्तेसाठी पक्ष फुटत असेल तर ही दुदैवी घटना आहे. आम्ही पक्षासोबत आहोत. 
- धनंजय दलाल, 
प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

बैठकीनंतर पुढील निर्णय 
दुपारी बैठक झाल्यानंतरच पुढचा निर्णय ठरेल. आम्ही मुंबईतच आहोत. 
- प्रतिभा धानोरकर, 
आमदार कॉंग्रेस, वरोरा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cautious role of NCP leaders