शेतकऱ्यांनो, धावा, पळा आणि त्वरा करा; राज्यात मंगळवारपासून कापूस खरेदी

विनोद इंगोले
Saturday, 7 November 2020

बाजारात ३,८०० ते ४,००० हजार रुपये या दराने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला. तब्बल पंधराशे रुपये या व्यवहारात शेतकऱ्यांना कमी मिळाले. आता मंगळवारपासून सीसीआयने ८३ केंद्रांवर कापूस खरेदीची घोषणा केल्याने बाजारात काही अंशी तेजी येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नागपूर : सीसीआयकडून मंगळवारपासून (ता. १०) कापूस खरेदीची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८३ केंद्रांच्या माध्यमातून खरेदी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात कापसाखालील सरासरी क्षेत्र ४१ लाख हेक्टर आहे. २०१९-२० या हंगामात राज्यात सरासरीपेक्षा एक लाखाची वाढ नोंदविण्यात आली. यावर्षी देखील सरासरीपेक्षा दोन लाख हेक्टरने लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी लागवड क्षेत्र सुमारे ४३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. ४५० लाख क्विंटल कापूस उत्पादकतेचा अंदाज तज्ज्ञांकडून लागवड क्षेत्रात वाढीच्या पार्श्वभूमीवर वर्तविण्यात आला होता.

सविस्तर वाचा - विश्वास बसेल का! एका उंदीरमुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

संततधार पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कापसावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. अनेक ठिकाणी बोंडसड झाली तर सध्यास्थितीत अनेक जिल्ह्यांमध्ये गुलाबी बोंडअळीने पीक पोखरले आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होणार असल्याचे जाणकार सांगतात.

त्यामुळे राज्यात सुरुवातीला अपेक्षित ४५० लाख क्‍विंटलची उत्पादकता ५० लाख क्विंटलने कमी होईल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली गेली आहे. त्यानंतर देखील बाजारात येणाऱ्या कापसाची प्रत अपेक्षित राहणार नाही. त्यामुळे त्याला दरही मिळणार नाही असे सांगितले जाते.

जाणून घ्या - नियम शिथिल नागरिक बिनधास्त! वाहनांचा वेग वाढला; अनेकांना गमवावा लागतोय जीव

संततधार पावसामुळे कापूस भिजला. परिणामी त्यात ओलावा अधिक असल्याने सीसीआयकडून खरेदीस विलंब होत होता. परिणामी दिवाळीसाठी लागणाऱ्या पैशांची सोय म्हणून काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री केली.

बाजारात ३,८०० ते ४,००० हजार रुपये या दराने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला. तब्बल पंधराशे रुपये या व्यवहारात शेतकऱ्यांना कमी मिळाले. आता मंगळवारपासून सीसीआयने ८३ केंद्रांवर कापूस खरेदीची घोषणा केल्याने बाजारात काही अंशी तेजी येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा - गर्भवती महिला पतीसोबत दुचाकीने जात होती रुग्णालयात; मात्र टिप्परच्या धडकेत झाला मृत्यू

८३ केंद्रांवर खरेदीचे नियोजन
उत्तरेतील पंजाब, हरियाणा, राजस्थान त्यासोबतच तेलंगणामध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मंगळवारपासून ८३ केंद्रांवर खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. आम्ही यापूर्वीच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आम्ही कापूस खरेदीला सुरुवात करणार आहोत. बारा टक्के ओलावा आणि इतर निकषाप्रमाणे एफ.ए.क्यू. दर्जाचा कापूसच घेतला जाईल.
- प्रदीप कुमार अग्रवाल,
अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक, भारतीय कापूस महामंडळ

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCIs cotton procurement in the state from Tuesday