सीसीटीव्ही फुटेजचा गोरखधंदा

अनिल कांबळे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर ः उपराजधानीतील काही लॉज प्रेमीयुगुलांना अगदी स्वस्तात रूम उपलब्ध करून देत असून त्यांच्या रूममध्ये "हिडन कॅमेरे' बसवीत आहेत. नागपुरातील काही जोडप्यांची अंतरंग क्रियेची क्‍लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती एका लॉज मालक आणि नोकराने तयार केल्याची चर्चा उपराजधानीत आहे.

नागपूर ः उपराजधानीतील काही लॉज प्रेमीयुगुलांना अगदी स्वस्तात रूम उपलब्ध करून देत असून त्यांच्या रूममध्ये "हिडन कॅमेरे' बसवीत आहेत. नागपुरातील काही जोडप्यांची अंतरंग क्रियेची क्‍लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती एका लॉज मालक आणि नोकराने तयार केल्याची चर्चा उपराजधानीत आहे.
इंटरनॅशनल बेव मार्केटमध्ये अशा व्हिडिओंना चांगली मागणी मागणी असल्याने लॉजमालक पैशाने मालामालही होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच सीताबर्डीतील कापड दुकानदाराने "ट्रायल रूम'मध्ये मोबाईल ठेवून युवतींचे "एमएमएस' तयार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार उघडकीस येत आहे, हे विशेष. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्हॉट्‌सऍप ग्रूपवर "सेक्‍स क्‍लिप इन नागपूर लॉज' नावाने एक व्हिडिओ वाऱ्याच्या गतीने व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये नागपुरातील एका लॉजमध्ये गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी प्रियकराच्या शारीरिक संबंधाचे चित्रण केल्या गेले आहे. या व्हिडिओमुळे मुलगी आणि युवकाची बदनामी झाली असून नातेवाईक आणि कुटुंबीयांपर्यंत प्रकरण पोहचल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे शहरातील लॉजही सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली आहे. नियमानुसार लॉजमध्ये रूम मिळविताना आधार कार्ड किंवा "फोटो आयडी' अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, सीताबर्डी, जरीपटका, सोनेगाव, वर्धा रोड, धरमपेठ, सदर, अंबाझरी, धंतोली, अजनी आणि सक्‍करदरा परिसरातील काही लॉजमध्ये ओळखपत्राविना प्रेमीयुगुलांना प्रवेश देण्यात येत आहे. त्यासाठी तीन हजार ते सात हजारांपर्यंत रक्‍कम प्रेमीयुगुलांकडून लॉजमालक उकळत आहेत. त्यानंतर दिलेल्या रूममध्ये असलेल्या "स्पाय कॅमेरा किंवा हिडन कॅमेरा'चे फुटेजही वेबसाईटला विकल्या जात असल्याची चर्चा आहे.
रूममध्ये कॅमेरे
लॉजमालक संशयास्पद प्रेमीयुगुलांना विशेष व्यवस्था असलेली रूम देतात. त्या रूममध्ये बेडवरील पंख्यात, लाइटच्या मधोमध, कपड्याच्या हॅंगरमध्ये तसेच बेडच्या कप्प्यात हिडन कॅमेरे लावलेले असतात. तासाभरासाठी किरायाने घेतलेल्या रूममध्ये प्रेमीयुगुल कोणतीही चौकशी किंवा तपासणी करीत नाहीत. येथेच गफलत होऊन काही दिवसांतच शारीरिक संबंधाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याचे कळते.
फुटेजचा होतो सौदा
काही विशिष्ट "ट्रिपल एक्‍स' वेबसाइटच्या संचालकांची "बेडरूम सीन' फुटेजला चांगली मागणी असते. त्या फुटेजच्या व्यवहाराची उलाढाल लाखाच्या घरात आहे. अशा क्‍लिप्स पाहणाऱ्या आंबटशौकिंनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक लॉजमालक अशा क्‍लिप बनवून थेट बेवसाइट आणि यू-ट्यूब चॅनेल्सला विकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रेडिमेड कपड्यांचे शोरूम, मॉल्स आणि अन्य दुकानात असलेल्या ट्रायल्स रूम आणि लॉजमध्ये असलेल्या रूम्सची आकस्मिक तपासणी करण्यासाठी झोन स्तरावर विशेष पथकाची स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांचे पथक अचानक भेट देऊन अशा प्रकाराची शहानिशा करतील. शाळकरी मुलींसाठी तक्रार पेटी प्रत्येक शाळेत ठेवली आहे तर दामिनी पथक तरुणींच्या सुरक्षेसाठी आहे. महिला सुरक्षेसाठी "बडी कॉप' आणि "रक्षा ऍप'सुद्धा आहेत.
- नीलेश भरणे, अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV footage become bussiness