स्कूलबस चालकांची चारित्र्य पडताळणीसाठी धडपड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

अमरावती : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या विषयाला न्यायालयाने जरी गांभीर्याने घेतले असले तरी अंमलबजावणीची जबाबदारी असलेले संबंधित प्रशासन बेजबाबदारपणे वागताना दिसत आहे.

अमरावती : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या विषयाला न्यायालयाने जरी गांभीर्याने घेतले असले तरी अंमलबजावणीची जबाबदारी असलेले संबंधित प्रशासन बेजबाबदारपणे वागताना दिसत आहे.
नियमाप्रमाणे ज्या स्कूलबस, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्या जाते, अशा वाहनांची पार्किंग रहदारीच्या रस्त्यांवर न करता रस्त्यापासून सुरक्षित शंभर मीटर अंतरावर करावी, असे शालेय शिक्षण विभागाने, गृहविभागाने जारी केलेल्या नियमांमध्ये आहे. परंतु बऱ्याच शाळांच्या इमारती, त्यांच्या सुरक्षाभिंती, सुशोभीकरणाचे परिसर रहदारीच्या रस्त्यांपर्यंत विस्तारले आहे. शहरात अशा अनेक शाळा आहेत की, त्यांच्या प्रवेशद्वारासमोर रहदारीच्या रस्त्यांवर शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेवर स्कूल बस, स्कूल व्हॅनसह प्रवासी ऑटोच्या रांगा लागलेल्या असतात. एकाचवेळी हजारो विद्यार्थी बाहेर पडतात, त्यामुळे रहदारीच्या रस्त्यांवर पार्किंग केलेल्या वाहनांत चढउतार करताना मोठा अपघात होण्याची भीती अधिक असते. काही शाळांना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या पार्किंगसाठी मैदाने आहेत. परंतु त्यांची त्याठिकाणी स्कूलबस पार्किंग करण्याची मानसिकता नाही. तर महिन्याला हजारो रुपये वसूल करणाऱ्या काही शाळांना तर खेळासाठीही मैदान नाही. त्यामुळे त्यांच्या स्कूलबस, व्हॅन रस्त्यावरच उभ्या राहतात. त्याचे सोयरसुतक शाळा प्रशासन, शिक्षण विभाग किंवा आता वाहतूक पोलिस, किंवा शाळांच्या परिवहन समित्यांनासुद्धा नाही. स्कूलबस, स्कूलव्हॅनसह ऑटोमध्ये आजही क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनींची वाहतूक केल्या जाते. त्यांची तपासणी शाळा सुरू होऊन चार दिवस झाले तरी, अशा वाहनांची तपासणी होताना दिसत नाही. स्कूलबस, व्हॅन चालकांना वाहन चालविण्याच्या प्रमाणपत्रासोबतच चारित्र्य प्रमाणपत्र आवश्‍यक केले आहे. अनेक चालकांनी त्यासाठी पोलिस ठाण्यात अर्ज सादर केलेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Challenges to verify the character of the school bus drivers