चमचमला मांडायच्या आहेत किन्नरांच्या समस्या

Chamcham
Chamcham

नागपूर - जन्माने तृतीयपंथी असले तरी, या तृतीयपंथीय समाजाचे जगणे त्यांच्या व्यथा वेदनांना न्याय मिळावा, त्यांनाही समाजाने समान अधिकार द्यावा याचा वेध ‘किन्नर’ या हिंदी चित्रपटातून मांडण्याचा संकल्प किन्नर चमचम गजभियने केला होता. मात्र, चमचम आज स्वतःच किन्नर समाजातीलच व्यक्तीने दिलेल्या वेदना रुग्णालयात भोगत आहे. असा प्रसंग आपल्या आयुष्यात येईल, असा विचार चमचमने स्वप्नातही केला नसेल.

चमचमने जिद्दीने शिक्षण घेतले. पदवी पूर्ण केली. यानंतर ती या किन्नर समाजघटकासाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेत तृतीयपंथींची वेगळी कहाणी चित्रपटातून साकारत तृतीयपंथीही सन्मानाने जगू शकतात असा संदेश देण्यासंदर्भात नुकताच दै. सकाळशी संवाद साधला होता. किन्नरांच्या सामाजिक, सांस्कृतिक समस्यांवर आधारित भावनाप्रधान चित्रपट तयार होणार हे निश्‍चित झाले होते. यासाठी १५ कोटींपर्यंतचे बजेट तयार केले होते. 

चित्रपटाचे नावही ‘किन्नर’ ठरवले होते. नागपुरात तयार होणाऱ्या या चित्रपटात उत्तम बाबांकडेच सेनापतीची भूमिका येणार होती, तसेच चमचम गजभिये आणि विद्या कांबळे प्रमुख भूमिका निभावणार होत्या.

असे आहे कथानक 
गुंड प्रवृत्तीकडून किन्नरांचे होणारे शोषण, मित्रांकडून मिळणारी वागणूक तसेच यांचे जगणे, त्यांचे हक्क व अधिकार अशा आशयाच्या कथानकाचे चित्रीकरणही काही प्रमाणात झाले आहे. दिवाळीपर्यंत ५० टक्‍के शूटिंग होईल, असा दुजोरा चित्रपटाचे मानस दिग्दर्शक सुजितकुमार बोरकर यांनी दिला होता. चित्रपटाची कथा भुरणदास सौरभ आणि सुजित कुमार यांची आहे. प्रदर्शनानंतर झालेल्या कमाईतून ४५ टक्‍के रक्‍कम अनाथालय, अंध-अपंगांचे आश्रम, वृद्धाश्रम, शेतकरी कुटुंबाचे सामूहिक विवाह सोहळे आणि गरिबांच्या औषधोपचारावर खर्च करण्यात येणार होती. १० टक्‍के रक्‍कम नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांसाठी खर्च करण्यात येणार होता. २५ टक्‍के रक्‍कम किन्नर समाजाच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे चमचमने सांगितले होते.  

पाहुणे कलाकार मिथुन चक्रवर्ती
राष्ट्रीय किन्नर सामाजिक संस्था आणि ‘साई फिल्म्स’ गोंदिया या बॅनरअंतर्गत ‘किन्नर’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती होणार होती. तीन कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय किन्नर सामाजिक संस्थेकडून खर्च करण्यात येणार असल्याचेही चमचमने सांगितले होते, तसेच ‘बिग बॉस फेम’ सेलिब्रिटी ‘लक्ष्मीनारायण त्रिपाठी’ ऊर्फ लक्ष्मी किन्नर हिच्याकडून मदत म्हणून एक कोटीचा निधी उभारण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. आमदार असलेली किन्नर शबनम मावशीनेही मदत देण्याचे कबूल केल्याचे सांगण्यात आले. या चित्रपटात मिथुन चक्रवती पाहुणे कलाकार म्हणून भूमिका करणार होते, अशी माहिती चमचमने दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com