तृतीयपंथीवर पहिल्यांदाच सार्वजनिक अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

नागपूर : तृतीयपंथींचे अंत्यसंस्कार गुप्तपणे पार पाडण्याची परंपरा आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच तृतीयपंथी चमचमवर सार्वजनिक स्वरूपात मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारात पहिल्यांदाच सामान्य नागरिकांसह बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारीही उपस्थित होते.

विदर्भातील नामांकित तृतीयपंथी चमचम ऊर्फ प्रवीण गजभियेवर (25, रा. मानकापूर) किन्नर गुरू उत्तमबाबा सेनापती याने साथीदाराच्या मदतीने चाकू-तलवारीने हल्ला केला होता. गंभीर जखमी चमचमवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चमचमवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, हार्टअटॅक आल्यामुळे चमचमचा सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. कळमना पोलिसांनी उत्तम बाबा तपन सेनापती (रा. कामनानगर), चच्चू ऊर्फ कमल उईके (21, रा. हंसापुरी), किरण अशोक गवळे (39, रा. हंसापुरी), लखन ऊर्फ सोनू श्रीराम पारशिवनीकर व शेख निसार शेख सादिक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.
मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास चमचमवर मेयो रुग्णालयात शवविच्छेदन झाले. यावेळी तृतीयपंथीयांनी गर्दी केली होती. पोलिसांनी तृतीयपंथीयांची समजूत घालून शांत केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी चार वाजताच्या सुमारास मानकापुरातून चमचमची अंत्ययात्रा निघाली व मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी होती. तसेच पोलिस ताफाही मोठ्या प्रमाणात तैनात होता. चमचमच्या हत्याकांडामुळे किन्नरवर्गात मोठी नाराजी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chamcham Gajbhiye news