
स्कायवॉक प्रॉडक्शनच्या वतीने ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात गुडगाव दिल्ली येथील द वेस्टीन हॉटेल मध्ये भरविण्यात आली. या 'मिस, मिस्टर, मिसेस इंडिया दिल्ली वर्ल्ड ' स्पर्धेसाठी ऑनलाइन ऑडिशन घेण्यात आली. देशभरातून १ लाख ८६ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
पुसद (जि. यवतमाळ) : अतिशय सामान्य कुटुंबातील अकरावीत शिकणाऱ्या चंदनिका चंचल तिवारी या पुसद कन्येने दिल्ली येथे आयोजित ' मिस इंडिया दिल्ली वर्ल्ड '२०२० या स्पर्धेत देशभरातून द्वितीय स्थान पटकावले. तिला सिनेअभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते चमकदार क्राऊन व आकर्षक मेडल प्रदान करण्यात आले. तिच्या या यशाने पुसदच्या गौरवात भर पडली आहे.
स्कायवॉक प्रॉडक्शनच्या वतीने ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात गुडगाव दिल्ली येथील द वेस्टीन हॉटेल मध्ये भरविण्यात आली. या 'मिस, मिस्टर, मिसेस इंडिया दिल्ली वर्ल्ड ' स्पर्धेसाठी ऑनलाइन ऑडिशन घेण्यात आली. देशभरातून १ लाख ८६ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी १०८ स्पर्धकांची निवड करण्यात आली . चंदनिकाने ऑनलाइन ऑडिशन देऊन प्रवेश मिळविला.या स्पर्धकांना १५ दिवसांचे ग्रूमिंग क्लासेस मध्ये प्रशिक्षण झाले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल चंदनिका तिवारी फर्स्ट रनरअप ठरली. तर दिल्ली येथील एअर होस्टेस आशिया वालियाने प्रथम क्रमांक पटकाविला.
पुसद येथील वसंत नगर सारख्या ग्रामीण भागातील चंदनिकाने कॅपिटल सिटीत मिळविलेल्या दिमाखदार यशाबद्दल तिचे कौतुक करताच तिने 'सकाळ'शी संवाद साधला. तिला लहानपणापासूनच नृत्य, अभिनयात गोडी व गती आहे. तिची मोठी बहीण सुकन्याने फेसबुक व इंस्टाग्रामवर स्कायवॉक प्रॉडक्शनची जाहिरात बघितली व चंदनिकाने भाऊ सौरभने घरीच मोबाईलवर काढलेली तिची चार छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठविली.
आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या चंदनिकाची निवड झाली व प्रशिक्षणासाठी तिला दिल्लीला बोलविण्यात आले, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. टॅलेंट दाखविण्याची हीच संधी आहे, ही खुणगाठ मनाशी ठरवून चंदनिकाने प्रशिक्षणात चांगला सराव केला व आयोजकांचे लक्ष वेधले.
प्रशिक्षणा बद्दल विचारले असता चंदनिका म्हणाली - " दुबई, काश्मीर, बंगलोर, दिल्ली, चेन्नई, पंजाब, दिल्ली, मुंबई अशा शहरी भागातून आलेल्या प्रोफेशनल स्पर्धकांचा सोबत सराव करताना आपल्यात काही कमी नाही याची जाणीव झाली. छोट्या गावातून आलेली मी काही करू शकणार नाही अशा काहीशा शहरी स्पर्धकांच्या भावना होत्या.
मात्र मी माझ्या परफॉर्मन्सवर फोकस केला. नृत्य, कॅटवॉक, टॅलेंट यावर भर दिला. हायहिलवर 'कॅटवॉक'ची प्रॅक्टिस करताना अनेकदा पाय दुखावले. परंतु जिद्द कमी पडली नाही. परफॉर्मन्स पाहून आयोजक खुश झालेत."
भविष्यातील स्वप्न कोणते? या प्रश्नाच्या उत्तरात चंदनिका म्हणाली - " मला पुढे मॉडेलिंग क्षेत्रात जायचं आहे. वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर 'मिस इंडिया' बनायचे स्वप्न आहे. स्वप्न मोठे आहे, परंतु ते साकार करण्याचा आत्मविश्वास स्कायवॉक स्पर्धेने मला दिला आहे."
चंदनिका ही धावपटू असून सध्या ती वेट लिफ्टिंगचा सराव करीत आहे. ती पुसद येथील शिवाजी विद्यालयात अकरावी कला शाखेत शिक्षण घेत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई संध्या, वडील चंचल, मोठी बहीण सुकन्या व कुटुंबीयांना दिले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
अतिशय सामान्य कुटुंबातील चंदनिकाने मिळविलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे. ती अवघ्या सोळा वर्षाची आहे. मात्र मॉडेलिंगमध्ये तिला खूप आवड आहे. टीव्ही चॅनेल्स, युट्यूब यातून ती शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. एक दिवस पुसदची चंदनिका सौंदर्य स्पर्धेत चमकेल, हा तिचा आत्मविश्वास निश्चितच प्रशंसनीय आहे. मॉडेल साठी आवश्यक असलेले चेहरेपट्टी, सौंदर्य, उंची चंदनिकाला लाभली आहे. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी तिला पालकांचे पाठबळ लाभले आहे.
संपादन : अतुल मांगे