हवालदिल शेतकऱ्याने कापसाचीच पेटवली चिता

दीपक खेकारे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

वनसडी (कोरपना), ता. 13 : हमीभावापेक्षा अत्यल्प दराने कापूस खरेदी केली जात आहे. व्यापारी, जिनिंग मालक यांच्याकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू आहे. याच्या निषेधार्थ सोनुर्ली येथील ईश्‍वर पडवेकर या शेतकऱ्याने चक्क कापसाची स्मशानभूमीत चिता पेटविली आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. घटना काल गुरुवारी घडली.

वनसडी (कोरपना), ता. 13 : हमीभावापेक्षा अत्यल्प दराने कापूस खरेदी केली जात आहे. व्यापारी, जिनिंग मालक यांच्याकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू आहे. याच्या निषेधार्थ सोनुर्ली येथील ईश्‍वर पडवेकर या शेतकऱ्याने चक्क कापसाची स्मशानभूमीत चिता पेटविली आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. घटना काल गुरुवारी घडली.
कोरपना तालुक्‍यातील सोनुर्ली. अडीच हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील ईश्‍वर पडवेकर यांच्याकडे 18 एकर शेती आहे. गत 20 वर्षांपासून ते शेती करतात. यावर्षी आधी पावसाने पाठ फिरविली. नंतर बोंडअळी आली. आता कापसाला हमीभाव नाही. त्यामुळे उत्पादनाचा खर्चही हाती येणार नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे. ईश्‍वर पडवेकर यांना यंदा 125 क्विंटल कापूस झाला. यातील 45 क्विंटल कापूस त्यांनी तीन हजारांच्या भावाने अगोदर विकला. काही दिवसांपूर्वीच दहा क्विंटल कापूस नारंडा येथील वैभव जिनिंगला विकण्यासाठी नेला. तो ग्रेडरने घेण्यास नकार दिला. घरी जाऊन कापूस पेटवून द्या, असा खोचक सल्ला द्यायलाही तो विसरला नाही.
तेथून ते कापूस घेऊन सोनुर्ली येथील इंदिरा जिनिंगमध्ये गेले. पंधराशे रुपये प्रतिक्विंटल येथूनच बोलीला सुरुवात झाली. शेवटी दोन हजार रुपयांच्या मोतीमोल भावात पांढरे सोने विकावे लागले. त्यामुळे पडवेकर हवालदिल झाले. घरी अजूनही 70 क्विंटल कापूस होता. मात्र, अत्यल्प दरात कापूस विकण्यास त्याचे मन धजावत नव्हते. शेवटी संतापून त्यांनी दहा क्विंटल कापूस सोनुली येथील स्मशानभूमीत नेला व त्याची चिता रचून तो पेटवून दिला.
मागितली होती परवानगी
भाव मिळत नसल्याने कापूस विकायचा कुठे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे कापूस पेटविण्याची परवानगी द्यावी, अशी लेखी मागणी जिल्हा प्रशासनाकडे पडवेकर यांनी 3 एप्रिल रोजी केली. मात्र, याची दखल प्रशासनाने घेतली नाही. शासन, दलालांच्या निषेधार्थ कापसाची चिता रचून त्यांनी हे प्रातिनिधिक आंदोलन केले. यातून शासनापर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दु:ख पोहोचेल, अशी आशा त्यांना आहे.

"कापसाची पडत्या भावाने खरेदी केली जात आहे. शासनाने निश्‍चित केलेला हमी भाव सुद्धा मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांची आधी फसवणूक झाली. त्यांना न्याय द्यावा. शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या जिनिंगचे परवाने रद्द करावे. यासाठी आपण लवकरच उपोषण करू.''
- ईश्‍वर पडवेकर, सोनुर्ली

 

Web Title: chandrapur cotton crop news