या कारणामुळे चंद्रपूरची महाकाली यात्रा झाली रद्द,  शेकडो वर्षांची परंपरा खंडित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

जिल्ह्यात 11 मार्चपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात अजूनपर्यंत संशयित किंवा रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे या आजारासंदर्भात कुणीही अफवा पसरवू नये. सण, उत्सव साजरे करताना नागरिकांनी एकत्र येऊ नये यासाठी काही काळासाठी शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

चंद्रपूर : जगात सध्या थैमान घातलेल्या कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या आजाराचा धसका घेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शेकडो वर्षांची परंपरा असलेली माता महाकालीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे, मुंबई येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आठ खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्ह्यात 11 मार्चपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात अजूनपर्यंत संशयित किंवा रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे या आजारासंदर्भात कुणीही अफवा पसरवू नये. सण, उत्सव साजरे करताना नागरिकांनी एकत्र येऊ नये यासाठी काही काळासाठी शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

गर्भवतीवरच केली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया 

जिल्हा प्रशासनाचा निर्णय
गर्दीतून हा आजार होण्याची शक्‍यता असल्याने नाट्यगृह, सिनेमागृहात जाणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार झपाट्याने संसर्ग होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ज्येष्ठांसह सामान्य नागरिकांनीही अनावश्‍यक प्रवास टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. 

चीन येथून चार, इटली, इराण, सौदरी अरब आणि सिंगापूर येथून प्रत्येकी एक असे एकूण आठ नागरिक जिल्ह्यात आले आहेत. इटली येथील नागरिकाचा आठवा दिवस असून, उर्वरित सातही नागरिकांना 14 दिवस पूर्ण झाले आहेत. ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यावर निगराणी ठेवली जाणार असल्याचेही डॉ. खेमनार म्हणाले. 

 

माता महाकालीची यात्रा दरवर्षी एप्रिल महिन्यात भरते. आजपर्यंत यात्रा अविरत सुरू होती. मात्र, जगासमोर कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. 
- सुनील महाकाले, 
ट्रस्टी, महाकाली मंदिर, चंद्रपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrapur district collector canceled mahakaali yatra