pregnancy
pregnancy

गर्भवतीवरच केली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया

वरोरा (चंद्रपूर) - मारेगाव तालुक्‍यातील बरेच रुग्ण आरोग्य सेवेसाठी वरोरा येथे येतात. त्यात प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या अधिक असते. या रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ सेवानिवृत्त झाल्यानंतर करारनाम्यावर स्थानिक महिला डॉक्‍टरची नियुक्ती करण्यात आली. या महिला डॉक्‍टर गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांबाबात निष्काळजीपणा करीत असल्याची ओरड रुग्णांचे नातेवाईक करत असतात .अशातच डिसेंबर महिन्यात वरोरा येथील महिला कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी भरती झाली. त्यावेळी ती गर्भवती होती. हे तिच्या शस्त्रक्रिया पूर्व चाचण्यांमधून डॉक्‍टरांच्या लक्षातही आले नाही आणि तिच्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही खळबळ जनक घटना फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आली . ती महिला गर्भवती असल्याचे कळताच गर्भपात करण्यासाठी तिला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. घडलेल्या चुकीवर पडदा टाकण्याचे काम वरिष्ठ अधिकारी व उपजिल्हा रुग्णालयातील सहकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आले. मात्र महिना लोटूनही कुठलीच कारवाई न झाल्याने रुग्णालयातील कर्मचारी दबक्‍या आवाजात चर्चा करतांना दिसत असून सदर प्रकरण दडपण्यासाठी लाखो रुपयांची चिरीमिरी दिल्याची चर्चा ही रुग्णालय परिसरात ऐकायला मिळत आहे .
कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया अयशस्वी होणे ही नवीन बाब नाही, मात्र गर्भवती महिलेवरच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया होणे ही बाब पहिल्यांदाच घडल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे .
सदर प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे उघडकीस येणार असून अशा निष्काळजी डॉक्‍टरांवर कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे .

द्वि सदस्यीय समिती गठीत
सदर प्रकरण दडपल्याची चर्चा झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक यांनी सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी रुग्णालयातील दोन डॉक्‍टरांची द्वि सदस्यीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.जी. एल दुधे यांनी दिली .

अधिकाऱ्यांची चुकी माफ
रुग्णालय म्हटले की अनेक चुका कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या हातून होत असतात पण रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या हातून झालेल्या किरकोळ चुकीवर ही कारवाईची तलवार चालविली जाते मात्र एवढा मोठा प्रकार एका तज्ज्ञ डॉक्‍टरकडून घडल्यानंतर ही सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने अधिकाऱ्यांची चुकी माफ कर्मचाऱ्यांनी केली कारवाईची तलवार अशी चर्चा दबक्‍या आवाजात रुग्णालयातील कर्मचारी करतांना दिसत आहे .

चौकशीसाठी समिती स्थापन
सदर प्रकाराबाबतची माहिती कर्मचाऱ्यांकडून प्राप्त होताच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कानावर ही बाब टाकली व त्या महिलेला जिल्हा रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी पाठविले व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी द्वि सदस्यीय समिती नेमून अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या .अहवाल सादर झाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.
डॉ. जी .एल दुधे
वैद्यकीय अध्यक्ष
उपजिल्हा रुग्णालय वरोरा

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com