चंद्रपुरातील 'जम्बो'चा गाशा गुंडाळणार, भाजप नेत्याच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांची 'फिल्डिंग'?

chandrapur municipal corporation may cancelled the permission for jumbo covid center
chandrapur municipal corporation may cancelled the permission for jumbo covid center

चंद्रपूर : शहरातील शंकुतला लॉन येथील सातशे खाटांच्या जम्बो खासगी कोविड सेंटवरवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरातील कोविड संलग्नित खासगी रुग्णालयांच्या दबावामुळे आता भाजपच्या एका नेत्याने 'जम्बो'ची परवानगी रद्द करण्यासाठी दबाब टाकत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे 'जम्बो'ने आपला गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे.

नागपुरातील काशी-गंगा इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि चंद्रपुरातील काही डॉक्‍टरांनी एकत्र येत सातशे खाटांच्या खासगी कोविड केअर सेंटरसाठी परवानगी मिळविली. या सेंटरचे कामही अंतिम टप्प्यात आहे. येत्या 10 ऑक्‍टोबरला हे सेंटर सुरू होणार होते. मात्र, तत्पूर्वीच या कोविड सेंटरवरून वाद झाले. आमदार किशोर जोरगेवार यांनी खासगी कोविड सेंटर येथे पन्नास टक्के खाटा सर्वसामान्य नागरिकांसाठी राखीव ठेवा, अशी मागणी केली. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनीसुद्धा आधी शासकीय कोविड सेंटर उभे करा, यासाठी आंदोलन केली. मनपाच्या आमसभेतसुद्धा याचे पडसाद उमटले. खासदार बाळू धानोरकर यांनीही शासकीय दरानुसार येथे उपचार व्हावा, अशी मागणी केली. 

विशेष म्हणजे या कोविड सेंटरला मनपाने एका दिवसात तत्त्वतः मान्यता दिली होती. या परवानगीसंदर्भात  माहिती नसल्याची महापौर राखी कंचर्लावार यांची आजवरची भूमिका होती. या खासगी कोविड सेंटरला प्रत्यक्ष कुणीच विरोध केला नाही. त्यामुळे चंद्रपूरकरांचा फायदाच होईल. मात्र, हे करताना शासकीय यंत्रणेनेही आपली व्यवस्था करावी, अशी प्रत्येकाची मागणी होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत खासगी कोविड सेंटर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरूच होते. दरम्यानच्या काळात सूत्र हलली. शहरातील सतरा खासगी रुग्णालयाचे संचालक या कोविड सेंटरमुळे अस्वस्थ झाले. यामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होईल, अशी भीती यातील काहींना वाटायला लागली. त्यातच डॉक्‍टर असलेल्या भाजपच्या एका पदाधिकाऱ्यालाही शंभर खाटांच्या खासगी कोविड सेंटरला परवानगी मिळाली. त्यामुळे "जम्बो'चा पत्ता कट करण्यासाठी त्यांनी "फिल्डींग' लावली, अशी चर्चा आहे. 

मनपाच्या ज्या सत्ताधाऱ्यांनी या खासगी कोविड सेंटरला मूक संमती दिली. त्यांनीच आता याची परवानगी रद्द करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी भाजपच्या एका नेत्याने दबाव आणल्याची माहिती सूत्रांनी दिली. संकटाच्या काळात "बिझनेस मॉडेल' म्हणून या कोविड सेंटरकडे बघितले जात होते. मात्र, त्यामुळे आपला "बिझनेस' तोट्यात जाईल, असे स्थानिक डॉक्‍टरांना वाटायला लागले. त्यामुळे या सेंटरची परवानगीच नाकारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जम्बो कोविड सेंटरमध्ये 50 टक्के खाटा राखीव ठेवा. परवानगी नाकारायची असेल तर सर्वांचीच नाकारा. यात राजकारण करू नका, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com