एमआयडीसीने लॉयड मेटल्सला केली हस्तांतरित जमीन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

गडचिरोली : बहुप्रतीक्षित चामोर्शी तालुक्‍यातील कोनसरी येथील लोहप्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली जमीन एमआयडीसीने शुक्रवारी (ता. 24) लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित केली आहे. यामुळे लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, सुमारे 800 सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

गडचिरोली : बहुप्रतीक्षित चामोर्शी तालुक्‍यातील कोनसरी येथील लोहप्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली जमीन एमआयडीसीने शुक्रवारी (ता. 24) लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित केली आहे. यामुळे लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, सुमारे 800 सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
एटापल्ली तालुक्‍यातील सुरजागड येथील पहाडावरील लोहखनिजाची लीज मिळाल्यानंतर लॉयड मेटल्स कंपनीने चामोर्शी तालुक्‍यातील आष्टीनजीकच्या कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने लॉयडने जवळपास 35 शेतकऱ्यांची सुमारे 50.29 हेक्‍टर शेतजमीन संपादित केली. जमिनीच्या एकूण किमतीच्या 10 टक्‍के रक्कम एमआयडीसीला दिली होती; त्यानंतर एमआयडीसीने ही रक्कम शेतकऱ्यांना दिली.
12 मे 2017 रोजी कोनसरी येथे प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी 7 फेब्रुवारी 2018 रोजी एमआयडीसीने संबंधित शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात रक्कम देण्याविषयीचे पत्र लॉयड मेटल्सला दिले. या पत्राची दखल घेत कंपनीने 8 फेब्रुवारी 2018 रोजी तत्काळ 6 कोटी 1 लाख 69 हजार 818 रुपये एमआयडीसीकडे आरटीजीएस केले.
फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबई येथे पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत "मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषद झाली. त्यात राज्य सरकार व लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारानुसार, लॉयड मेटल्स कंपनी कोनसरी येथे 700 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई
प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम जून 2020 पर्यंत होणार आहे. उर्वरित काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र, काही अडचणींमुळे एमआयडीसीने जमीन या कंपनीला हस्तांतरित केली नव्हती. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 23) व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन प्रशासनाला तत्काळ सर्व प्रकारच्या परवानग्या देण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निर्देशाची दखल घेत एमआयडीसीने सुक्रवारी (ता.24) लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडला 50.29 हेक्‍टर आर जमीन हस्तांतरित करीत असल्याचे पत्र दिले.

Web Title: chandrapur news