एकीकडे दारूबंदी तर दुसरीकडे गांजा तस्करी; एलसीबीनं जप्त केला तब्बल ११ लाखांचा मुद्देमाल  

श्रीकांत पशेट्टीवार 
Tuesday, 22 December 2020

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना यासंदर्भात कारवाई करण्यासाठी एनडीपीएसचे विशेष पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या.

चंद्रपूर : तेलंगणातून गांजा तस्करी करून परिसरात विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे., तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजुरा पोलिस ठाण्यात संबंधित तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली. 

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना यासंदर्भात कारवाई करण्यासाठी एनडीपीएसचे विशेष पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खाडे यांनी पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात राजेंद्र खनके, मिलिंद चव्हाण, जमीर पठाण, अनुप डांगे, जावेद सिद्दीकी यांचे पथक तयार केले. या पथकाला 19 डिसेंबरला तेलंगणा राज्यातून राजुरा येथे गांजाची तस्करी करून विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली. 

नक्की वाचा -  Video : टार्गेट-२०२१ : खेळाडू कधीच हिंमत हारत नसतो; वाचा शुभांगी राऊतच्या भावना

त्यानंतर पोलिस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनात छापा टाकण्यासाठी पथकाने राजुरा गाठले. तस्करीतील मुख्य सतीश मुंडी तेलजिलवार हा शिवाजीनगरातील नागमल्लेश्‍वरी यांच्या घरी किरायाने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेलजिलवार याच्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी घरी सुनील मडावी, नजिरशहा शहेनशहा, पुरुषोत्तम जंजिर्ला हे तिघे आढळून आले.

घरातून तब्बल आठ लाख 30 हजार 220 रुपये किमतीचा 69 किलो 185 ग्रॅम गांजा तसेच मोबाईल, गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण 10 लाख 41 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सतीश मुंडी उर्फ मोंडी तेलजीरवार (वय 22, रा. सोंडो), सुनील मडावी (वय 38, रा. गडचांदूर), नजिरशहा शहेनशहा (वय 45, रा. गडचांदूर), पुरुषोत्तम जंजिर्ला (वय 57, रा. धोपटाळा) अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत.

हेही वाचा - Success Story : लागवड एकदाच अन् उत्पादन ३५ वर्ष,...

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गांजा तस्करी सुरू होती. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करून तब्बल आठ लाखांहून अधिक रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात यश आले. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
- बाळासाहेब खाडे,
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrapur police caught drugs worth rupees 11 lacs