Chandrapur : महसूल विभागाकडून थट्टा ; दुपारी पदोन्नती, सायंकाळी निवृत्ती Chandrapur Revenue Department Promotion afternoon retirement in the evening | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदोन्नती

Chandrapur : महसूल विभागाकडून थट्टा ; दुपारी पदोन्नती, सायंकाळी निवृत्ती

चिमूर : नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार संवर्गात पदोन्नती, तहसीलदार संवर्गातून उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे २० एप्रिलला शासन आदेश काढण्यात आले. या आदेशाला ४१ दिवस लोटूनही त्यांच्या नियुक्ती अंमलबजावणीचा मंत्रालय प्रशासनाला विसर पडला. यापैकी ३१ मे रोजी सायंकाळी निवृत्त होणाऱ्यांना दुपारी पदस्थापनेचा आदेश देऊन त्यांची महसूल विभागाने एकप्रकारे थट्टाच केली आहे.

राज्यातील तहसीलदार गट- अ संवर्गातील रिक्त पदानुसार पदे भरण्याकरिता नायब तहसीलदार गट- ब संवर्गातील ७८ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याकरिता महसूल व वन विभागातर्फे २० एप्रिलला आदेश काढण्यात आला होता. या आदेशाप्रमाणे यादीत समाविष्ट अधिकारी आनंदी झाले. या आनंदात अनेकांनी पेढे वाटले. आता काही दिवसातच तहसीलदार म्हणून रिक्त असलेल्या ठिकाणी आपली नियुक्ती होईल. तहसीलदार पद भूषविण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी यासर्व पदोन्नत यादीतील प्रत्येकाला आशा होती. मात्र तहसीलदार म्हणून नियुक्तीच्या आदेशाची आजघडीला ४१ दिवस होऊनही प्रतीक्षा संपलेली नाही.

पदोन्नत नायब तहसीलदारांना तहसीलदार म्हणून नियुक्ती द्यायला महसूल विभागाला विसर पडला की जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे, मंत्र्यांप्रमाणे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही चढाओढीच्या राजकारणाची बाधा झाली काय असा प्रश्न पडला आहे. ३१ मे रोजी नागपूर विभागातील चिमूर तहसील येथील नायब तहसीलदार तुळशीदास कोवे, कोकण विभागातील नायब तहसीलदार एस. के. खेडसकर निवृत्त होणार आहेत. या दोन्ही नायब तहसीलदारांना महसूल विभागाकडून सायंकाळी निरोप देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मात्र, दुपारीच नायब तहसीलदार कोवे यांना गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे व खेडसकर यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पदस्थापनेचे आदेश मंत्रालयातून धडकले. ज्यामुळे यांना दुपारी तहसीलदार म्हणून रुजू होऊन सायंकाळी निवृत्ती मिळाली. ७८ पैकी दोघांचेच आदेश निवृत्तीच्या दिवशी काढण्यात आले. उर्वरित अधिकाऱ्यांना ४१ दिवसांपासून प्रतीक्षेत ठेवून थट्टा सुरू आहे.

महसूल विभागाने २० एप्रिलला तहसीलदार संवर्गातील ५८ अधिकाऱ्यांना उप जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली. मात्र, आज यांच्याही पदोन्नतीला ४१ दिवस होऊन त्यांनासुद्धा नियुक्त्या दिलेल्या नाहीत.

महसूल विभागाच्या २० एप्रिलच्या शासन निर्णयानुसार तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे आनंद झाला. मात्र, तब्बल ४१ दिवसानंतर आज ३१ मे रोजी दुपारी पदस्थापनेचे आदेश पाठविण्यात आले. दुपारी तहसीलदार म्हणून पदस्थापना झाल्यानंतर सांयकाळी निवृत्त होत आहे. ही एकप्रकारची थट्टा आहे.

- तुळशीदास कोवे,नायब तहसीलदार, चिमूर