esakal | चंद्रपूर जिल्ह्यात दारू, तंबाखूची तस्करी डोंग्यातून
sakal

बोलून बातमी शोधा

CRIME

चंद्रपूर जिल्ह्यात दारू, तंबाखूची तस्करी डोंग्यातून

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूसोबतच सुगंधित तस्करीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या तस्करीसाठी खुष्कीच्या मार्गासह आता जलमार्गही वापरले जात आहेत. इतर राज्यातून येणारी अवैध दारू व सुगंधित तंबाखूचा पुरवठा चंद्रपूर जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना करण्यासाठी चक्क डोंग्याचा (छोटी नाव) वापर होत असून अशा प्रकारचे तस्करी करणार्‍यांवर पोलिसांनी रविवारी (ता.5) कारवाई केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना डोंग्याच्या साहाय्याने अवैध दारू व सुगंधित तंबाखूचा पुरवठा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पकडून 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आरमोरी पोलिस, मुक्तिपथ तालुका चमू व किटाळी गाव संघटनेने संयुक्तरीत्या केली. याप्रकरणी दोघांवर आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरमोरी तालुक्यातील किटाळी घाटावरून डोंग्याने हळदा येथे अवैध दारू व सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणार्‍या दोघांना किटाळी गाव संघटनेच्या सदस्यांनी अडवले.

हेही वाचा: राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये एक तृतीयांश घट; 16 टक्के गंभीर रुग्ण

यासंदर्भात मुक्तिपथ तालुका चमूला माहिती देण्यात आली. त्यानुसार आरमोरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी देऊळगाव येथील जितू सहारे याच्याकडून 15 हजार रुपये किंमतीचा 60 पॉकेट ईगल सुगंधित तंबाखू व सूर्यडोंगरी येथील आशीष लालाजी मेश्राम याच्याकडून 5 हजार रुपये किंमतीची 20 लिटर मोहफुलाची दारू असा एकूण 20 हजारांचा मुद्देमाल आरमोरी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोन्ही अवैध व्यावसायिकांवर आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे यांच्या नेतृत्वात बिट अंमलदार कुळमेथे, कांबळे यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते. आधीच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात दारू व तंबाखूची तस्करी होत असते. छत्तीसगड व तेलंगणा राज्यासह नजीकच्या गोंदिया जिल्ह्यातून आणि आता दारूबंदी उठलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही दारू गडचिरोलीत येते. तसेच इथे येणारी परराज्यातील दारू व तंबाखू चंद्रपूरला पाठविण्यात येतो. त्यासाठी रस्त्यासोबतच आता वैनगंगा नदीच्या पात्राचाही वापर होत असल्याने पोलिस प्रशासनापुढची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा: 'मराठी माणसाच्या पराभवानंतर जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे'

34 रुग्णांची वाटचाल दारूमुक्तीकडे

मुक्तिपथ अभियानातङ्र्के सिरोंचा, चामोर्शी, अहेरी व कोरची येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयात शुक्रवारी तालुका क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून 34 रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सिरोंचा तालुका क्लिकमध्ये 4, चामोर्शीत 9, अहेरीत 16 तर कोरची तालुका क्लिनिकमध्ये 5 रुग्णांनी उपचार घेतला. अशा एकूण 34 रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी रुग्णांना समुपदेशनसुद्धा करण्यात आले. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना देण्यात आली. रुग्णांची केस हिस्टरी घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले. तसेच रुग्णांवर औषधोपचारसुद्धा करण्यात आले. क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेतल्यास व्यसनातून मुक्त होण्यास मदत मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी क्लिनिकचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुक्तिपथ अभियानातर्फे करण्यात आले.

loading image
go to top