नव्या भरतीकरिता पोलिस उपनिरीक्षकांचा बळी

अमित वेल्हेकर
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

ही माहिती खरी आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला. त्यामुळे यावर मी कुठलीही औपचारिक प्रतिक्रिया देऊ शकणार नाही.
- निशिकांत मोरे, पोलिस उपमहानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे

राज्यातील 17 अधिकाऱ्यांची घरवापसी; पुण्यातील चार जणांचा समावेश
चंद्रपूर - राज्य पोलिस खात्यातील मोटार परिवहन विभागातील तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आलेल्या 17 पोलिस उपनिरीक्षकांना त्यांच्या पूर्वपदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व जण सहायक पोलिस उपनिरीक्षक असताना पोलिस उपनिरीक्षकपदाची खातेनिहाय परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आता या पदासाठी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.

मोटार परिवहन विभागाअंतर्गत 2011 ला पोलिस उपनिरीक्षकपदाच्या 28 जागांसाठी विभागीय परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 79 सहायक पोलिस उपनिरीक्षकांनी परीक्षा दिली. यापैकी 50 जण उत्तीर्ण झाले, तर गुणक्रमांकानुसार पहिल्या 28 जणांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. मात्र, ती कायमस्वरूपी नव्हती. नियुक्ती देताना त्यांना 260 दिवसांकरिता तात्पुरत्या स्वरूपात पदान्नती देण्यात येत असल्याचे नियुक्ती आदेशात स्पष्ट केले होते.

हे अधिकारी 16 नोव्हेंबर 2011 रोजी नियुक्तीच्या ठिकाणी रुजूही झाले. त्यांचा 364 दिवसांचा कालावधी संपून गेल्यानंतर सलग सहा वर्षे त्यांनी या पदावर कर्तव्य बजाविले. मात्र, आता त्यांना मूळ पदावर रुजू होण्याचा आदेश मिळाल्याने त्यांना धक्का बसला आहे. या सर्वांनी आणखी एका वर्षांची मुदत मिळण्याबाबत विनंती केली होती. तीही फेटाळण्यात आली. हा आदेश 28 जुलैला प्राप्त झाला.

पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, प्रमोद जाधव, दत्तात्रय पवार, संजय बोरेकर (चौघेही पुणे), गोरक्षनाथ कांबळे, प्रकाश होमकर, तुषार सुतार (तिघे मुंबई), अब्दुल कुरेशी (चंद्रपूर), महादेव कर्चे (सोलापूर), भगवान घायतड (नाशिक), रमेश खरात (हिंगोली), विनोदकुमार तिवारी (अमरावती), प्रकाश पोचमपल्लीवार, शमसुद्दीन शेख (दोघे नागपूर), मतीश सिकदार (गडचिरोली), दीपक पाटील (नवी मुंबई) व प्रदीप चव्हाण (सिंधुदुर्ग) या 17 जणांना मूळ पदावर रुजू होण्याचा आदेश मिळाला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करावे लागणार आहे.

Web Title: chandrapur vidarbha news police sub-inspector transfer for new recruitment