कामे तर झाले, पण देयकेच मिळेना; चार वर्षांपासून केली जातेय अडवणूक

chandrapur zp not give pending bills even works done
chandrapur zp not give pending bills even works done

चंद्रपूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली आहे. मात्र, विविध कारणे समोर करून या कामांची देयके अडविली जात आहेत. ब्रह्मपुरी तालुक्‍यातील दहा ते पंधरा ग्रामपंचायतींची कुशल कामांची देयके गेल्या चार वर्षांपासून त्रुटीत अडविण्यात आली आहेत. त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी असलेल्यांनी हात वर केल्याने जवळपास सहा ते सात कोटींची अद्याप अदा करण्यात आली नाही. विशेष म्हणजे अकुशल कामांची देयके अदा करण्यात आली आहेत.

ग्रामीण भागाचा विकास व्हावा, गावातील मजुरांना कामासाठी भटकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली. या अंतर्गत मजुरांना गावातच रोजगार मिळू लागला होता. यात काम नसल्यास त्याला मजुरी देण्याची तरतूद आहे. त्यामुळे काम नसल्याने मजुरीही मजुरांना मिळायची. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. यात प्रामुख्याने कुशल आणि अकुशल कामांचा समावेश असतो. कुशल कामात सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, बंधारे, पाणंद रस्त्याचे खडीकरण यासह अन्य काही कामांचा समावेश असतो, तर अकुशल कामे मातीकामाशी संबंधित असतात. ब्रह्मपुरी तालुक्‍यात येत असलेल्या नीलज, खरकाडा, गांगलवाडी, चिचगाव, हळदा, वायगाव, आवळगाव, जुगनाळा, चोरटी, मांगली, सायगाव, कळमगाव, कोसंबी, पिंपळगाव, सोंदरी, नान्होरी यासह अन्य काही ग्रामपंचायतींत कुशल, अकुशलची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. ही कामे 2016-17, 2017-18, 2018-19 या सत्रांत करण्यात आली. 

कुशलची कामे ग्रामपंचायतींच्या माध्यातून होतात. कामाच्या अनुशंगाने लागणारे साहित्य ग्रामपंचायती पुरवठादारांकडून मागविते. कामे झाल्यावर त्याची देयके पंचायत समितीस्तरावर पाठविली जातात. तेथून ही देयके जिल्हा परिषदेकडे पाठविली जातात. मात्र, गेल्या चार वर्षांपासून दहा ते पंधरा ग्रामपंचायतींची देयकेच अदा करण्यात आली नाही. त्यामुळे पुरवठादारांचे देयके अडून आहे. जवळपास सहा ते सात कोटींची ही देयके आहेत. देयकांत चुका काढण्यात आल्या. त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची आहे. मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हात वर केले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची देयके अडून आहेत. देयके अदा करण्याबाबत जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, याची माहिती योग्य त्या पद्धतीने दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुशल कामांची देयके अडून आहेत. या देयकांत काही चुका असतील तर त्याची दुरुस्ती व्हावी. कोट्यवधींची देयके अडून असल्याने पुरवठादारांचे बोलणे ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना सहन करावे लागत आहे. अडलेली बिले तातडीने अदा करण्याबाबत कारवाई करण्यात यावी.
- प्रमोद चिमूरकर, जिल्हा परिषद सदस्य.

सर्वसाधारण सभेतही माहिती देण्यास टाळाटाळ -
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांनी कुशल कामांच्या देयकांचा मुद्दा कित्येकदा उचलून धरला. मात्र, त्यांच्या या प्रश्‍नाला नेहमीच बगल देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सभेत हा मुद्दा उपस्थित केला. मात्र, तेव्हा त्याला टाळण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com