कॉंग्रेस, भाजपची व्होटबंदी करा : ऍड. चंद्रशेखर आझाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

अमरावती : सध्या सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष तसेच कॉंग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसच्या पतनासाठी भीम आर्मीचा पुढाकार राहील. जनतेने या दोन्ही पक्षांची व्होटबंदी करावी, असे आवाहन भीम आर्मीचे प्रमुख ऍड. चंद्रशेखर आझाद यांनी आज, शुक्रवारी येथील जाहीर सभेत केले.

पुणे, मुंबई तसेच लातूर येथील सभांना परवानगी नाकारण्यात आल्यावर अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर राज्यातील पहिल्या सभेला चंद्रशेखर आझाद यांनी संबोधित केले. ते पुढे म्हणाले, आज देशाचा राज्यकारभार नागपूरवरून संविधानाला बाजूला सारून करण्यात येत आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक मनुस्मृती विरुद्ध संविधान अशीच राहणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय मंडळींनी केवळ आंबेडकरी मतांवर डोळा ठेवून आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेतल्या. मात्र, आता आंबेडकरी जनतेला भीम आर्मीच्या रूपाने एक सशक्त पर्याय मिळाला आहे. भीमा कोरेगावचा बदला आगामी लोकसभा निवडणुकीत संविधानात्मक मार्गाने घेऊ, असेही आझाद म्हणाले. देशात आज अल्पसंख्याक समुदाय भीतीच्या वातावरणात जगत आहे. गाईंसाठी माणसांना कापले जात आहे. अशा स्थितीत शोषित, पीडितांनी आता मतपेटीच्या माध्यमातून उठाव केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
कुणालाही राजकीय समर्थन नाही
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी भीम आर्मीकडून कुणालाही समर्थन देण्यात आलेले नाही, असे आझाद यांनी स्पष्ट केले.

Web Title: chandrashekhar azad