बीए, बी.कॉम, बी.एस्सी.चे वेळापत्रक बदला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाने १० ते १२ तारखेच्या २९८ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बदललेल्या वेळापत्रकानुसार बीए, बी.कॉम, बी.एस्सीच्या सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षा ११ मे ते २६ जूनपर्यंत घेण्यात येणार आहेत.

नागपूर - लोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाने १० ते १२ तारखेच्या २९८ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बदललेल्या वेळापत्रकानुसार बीए, बी.कॉम, बी.एस्सीच्या सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षा ११ मे ते २६ जूनपर्यंत घेण्यात येणार आहेत. एक जूनपासून देशभरातील नामवंत  संस्थांच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार आहे. यापूर्वी सहाव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट राज्यपालांना केल्याची माहिती आहे.

देशभरात असलेल्या नामवंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, एपीयू, आयएनएफएलव्ही, अजीम प्रेमजी विद्यापीठ आणि इतर स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या प्रवेशासाठी एप्रिल महिन्यात परीक्षा होतात. त्या परीक्षांचे निकाल आल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश देत एक जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होते. विद्यापीठातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी या महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा दिली आहे. मात्र, या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया आणि महाविद्यालय सुरू होण्याच्या तारखात विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे ११ मे रोजी एलएलबीच्या प्रवेशासाठी राज्याच्या ‘सीईटी सेल’मार्फत प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा पेपर द्यावा की पात्रता परीक्षेचा, हे कळेनासे झाले आहे. याबद्दल विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे संपर्क साधला असता त्यांना वेळापत्रकात कुठलाही बदल होणार नसल्याचे सांगून परत पाठवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी निराश झाले. आता वेळापत्रकात बदल व्हावा यासाठी राज्यपालांकडेच साकडे घातले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

विद्यार्थ्यांच्या करिअरचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याने विद्यापीठाने सकारात्मक भूमिका ठेवून वेळापत्रकात बदल करण्याची अपेक्षा आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. याबद्दल कुलगुरूंची भेट घेऊन चर्चा करेल. 
- महेंद्र निंबार्ते, प्रदेशाध्यक्ष, पदवीधर महासंघ.

Web Title: Change the schedule of BA, B.Com, B.Sc.

टॅग्स